Mukesh Ambani Buys Dubai Mansion At 163 Million Dollars: जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणारे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दुबईमध्ये एक महागडं घर विकत घेतलं आहे. दुबईमध्ये समुद्राला लागून असलेलं हे घर शहरातील सर्वात महागड्या आलिशान वस्तीमधील आहे. मागील काही महिन्यांमध्ये अंबानींनी दुबईत खरेदी केलेली ही दुसरी स्थावर मालमत्ता आहे.
या व्यवहाराशीसंबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश अंबांनींनी मागील आठवड्यामध्ये १६३ मिलियन अमेरिकी डॉलर्सला हा व्यवहार केला. भारतीय चलनानुसार आजच्या डॉलरच्या दराने ही रक्कम एक हजार ३४८ कोटी ३ लाख ५२ हजार इतकी होते. कुवैतचे उद्योजक मोहम्मद अल्सहया यांच्याबरोबर अंबानींनी हा व्यवहार केला आहे. यासंदर्भातील माहिती देणाऱ्या व्यक्तींनी या व्यवहाराबद्दल बोलण्याची अधिकृत परवानगी नसल्याने नावांचा खुलासा न करण्याची विनंती प्रसारमाध्यमांना केल्याचं ब्लुमबर्ग या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
मोहम्मद अल्सहया हे दुबईमध्ये अनेक फ्रॅन्चायझींची दुकान चालवतात. यामध्ये स्टारबक्स, एच अॅण्ड एम, व्हिक्टोरियाज सिक्रेट यासारख्या ब्रॅण्डचा समावेश आहे. तर मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असून ही कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचं एकूण मूल्या ८४ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकं आहे.
मागील काही काळापासून अंबानी परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचं चित्र दिसत आहे. मागील वर्षी युनायेड किंग्डममधील स्टोक पार्क या क्लबसाठी रिलायन्सने ७९ मिलियन अमेरिकी डॉलर्स मोजले होते. ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार अंबानी न्यू यॉर्कमध्येही जागेसंदर्भातील व्यवहार करण्याच्या तयारीत आहेत.
अंबानींनी आता घेतलेला बंगला हा त्यांनी मागील वर्षी याच परिसरामध्ये घेतलेल्या ८० मिलियन अमेरिकी डॉलर्सच्या बंगल्यापासून जवळच आहे. त्यावेळीही अंबानींनी घेतलेला बंगला हा या भागातील सर्वात महागाडा बंगला ठरला होता. मात्र काही महिन्यांनी याच भागातील अन्य एक बंगला ८२.४ मिलियन अमेरिकी डॉलर्सला विकला गेला होता.
दुबईमधील सरकारी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाम जुमिहीरवरील या बंगल्याचा व्यवहार १६३ मिलियन अमेरिकी डॉलर्सला मागील आठवड्यात झाला. या व्यवहाराबद्दलची इतर माहिती उघड करण्यात आलेली नाही. अंबानी तसेच कुवैतच्या या उद्योजकानेही यासंदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.