दरवर्षी फोर्ब्ज मॅगझीन जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिध्द करते. त्यानुसार भारतातले सर्वात धनवान माणसांचीही यादी केली जाते. या यादीत यावर्षी पहिल्या स्थानावर राहिलेले भारतीय आहेत…..मुकेश अंबानी

आता हे आश्चर्य राहिलेलं नाही. गेली ९ वर्ष मुकेश अंबानी सगळ्यात श्रीमंत भारतीय ठरत आहेत. २००० च्या दशकाच्या सुरूवातीला कधीतरी भारतीय वंशाचे स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. पण गेली ९ वर्ष सर्वात श्रीमंत भारतीयाच्या स्थानावर मुकेश अंबानींनी मजबूत मांड ठोकली आहे. त्यांची संपत्ती २३ अब्ज डाॅलर्स एवढी प्रचंड आहे. तर यावेळी दुसरे सर्वात श्रीमंत भारतीय ठरलेले लक्ष्मी मित्तल अंबानींच्या कितीतरी मागे आहेत.

आता सर्वात श्रीमंत भारतीय कोण या प्रश्नाचं उत्तर आश्चर्यचकित करणारं राहिलेलं नाहीये.  भारतीय उद्योगक्षेत्रात प्रभावी असलेला ‘रिलायन्स’ ब्रँडची गेली काही वर्ष पध्दतशीरपणे वाढ करत मुकेश अंबानी यांनी आपलं स्थान मजबूत केलं आहे. पण ‘रिलायन्स’ ब्रँड वापरणारे त्यांचे सख्खे बंधू आणि प्रतिस्पर्धी श्रीमंतांच्या या स्पर्धेत बरेच मागे फेकले गेले आहेत. मुकेश अंबानींच्या २३ अब्ज डाॅलर्स संपत्तीच्या तुलनेत अनिल अंबानींची अडीच अब्ज डाॅलर्सची संपत्ती बरीच कमी आहे.

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या स्थानावर कोण हा प्रश्नही आता विनोदीच ठरलाय. कारण गेल्या २३ वर्षांपैकी १८ वर्ष या  यादीत बिल गेट्स अव्वस स्थानावर आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेले वाॅरन बफे यांनीही आपलं स्थान गेली अनेक वर्षं सोडलं नाहीये. २३ अब्ज डाॅलर्स संपत्ती असणारे आपले मुकेश अंबानी जागतिक क्रमवारीत चक्क ३३ व्या स्थानावर आहेत!

म्हणजे बिल गेट्स यांची यावर्षीची संपत्ती किती? ८६ अब्ज डाॅलर्स!!

एका अब्जावर किती शून्यं असतात हेसुध्दा दोन सेकंदात चटकन सांगता न येणारे आपण सगळे; लागूयात महिनाअखेरीच्या हिशोबाला चला!

Story img Loader