उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा साखरपुडा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची लेक इशा अंबानी जुळ्या बाळांसह भारतात परतली होती. अशातच अंबानी कुटुंबात आणखी एक आनंदाचा क्षण आला आहे. अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंटशी झाला आहे. लवकरच दोघांचं लग्न होणार आहे.
अनंत आणि राधिका मागच्या काही वर्षांपासून एकत्र आहेत. राधिका अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमांचा भाग असते. दोघांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत्या. अशातच आता दोघांचाही साखरपुडा झाला आहे. अनंत आणि राधिकाच्या साखरपुड्याची बातमी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विटरवरून सर्वांना दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये या नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये पार पडला. नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात त्यांचा साखरपुडा झाला. या प्रसंगी अंबानी आणि मर्चंट कुटुंबीय उपस्थित होते. परिमल नाथवानी यांनी ट्वीट केलेल्या फोटोत अनंत आणि राधिका खूप सुंदर दिसत आहेत. अनंतने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि राधिका बेबी पिंक लेहेंगा आणि दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहे.