देशातल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशिया खंडातले दुसऱ्या क्रमांकावरचे श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांच्या घरी लवकरच सनईचे सूर ऐकू येणार आहेत. कारण गुरूवारीच त्यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट या दोघांचा साखरपुडा झाला. मुकेश अंबानी यांचे आता तीन व्याही आहेत. हे तिघंही कोट्यधीश आहेत. तिघांकडे अमाप संपत्ती आहे. मात्र या तिघांपैकी सर्वात श्रीमंत कोण माहित आहे का? तेच आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत
पीरामल कुटुंबाची सून आहे इशा अंबानी
अंबानी कुटुंबाचे जे व्याही आहेत त्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी इशाच्या सासरच्या मंडळीबाबत बोलायचं झालं तर इशा ही पीरामल कुटुंबाची सून आहे. इशाचं लग्न १२ डिसेंबर २०१८ ला आनंद पीरामलशी झालं. अजय पीरामल यांच्या नेतृत्त्वात पीरामल ग्रुप चालतो. पीरामल ग्रुप हा देशातल्या बड्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक आहे.
मुकेश अंबानी यांचे व्याही असलेले अजय पीरामल हे देशातल्या दिग्गज उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांची कंपनी पीरामल एंटरप्राईजेस फार्मा, हेल्थकेअर आणि फायनांशिअल सर्व्हिसेस जोडली गेली आहे. पीरामल ग्रुपच्या ब्रांचेस जगातल्या ३० देशांमध्ये आहेत. १९७७ मध्ये वयाच्या २२ वर्षी अजय पीरामल यांनी कापड व्यवसाय सुरू केला होता. ज्यानंतर त्यांनी पीरामल ग्रुपची मोठी वाटचाल केली आणि पीरामल ग्रुप उदयास आणला यशस्वी करून दाखवला. फार्मा सेक्टरमध्ये त्यांनी आपली खास ओळख तयार केली आहे.
अजय पीरामल यांच्याकडे किती आहे संपत्ती?
पीरामल ग्रुपचे अजय पीरामल यांच्या पत्नी स्वाती पीरामल व्हॉईस चेअरमन आहेत. तसंच त्यांची मुलं आनंद आणि नंदिनी हे दोघंही कंपनीच्या बोर्ड मेंबर्समध्ये आहेत. अजय पीरामल यांची एकूण संपत्ती ३ अरब डॉलर अर्थात सुमारे २४ हजार ८२५ कोटींच्या घरात आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अजय पीरामल हे ६२ व्या क्रमांकावर आहेत.
२०१९ मध्ये झालं आकाश अंबानीचं लग्न
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचं लग्न ९ मार्च २०१९ ला श्लोका मेहता सोबत झालं. श्लोका मेहता ही हिरे व्यावयासिक अरूण रसेल मेहता यांची मुलगी आहे. देशातल्या प्रसिद्ध हिरे व्यावसायिकांमध्ये अरूण रसेल मेहता यांची गणती होते.
श्लोकाचे वडील अरूण रसेल मेहता आणि मुकेश अंबानी यांचे व्याही हेदेखील कोट्यधीश आहेत. मेहता हे Rosy Blue या कंपनीचे MD आहेत. ही कंपनी जगातल्या टॉप डायमंड कंपन्यांमध्ये गणली जाते. भारतातल्या २६ शहरांत या कंपनीचे ३६ हून जास्त स्टोअर्स आहेत. बिझनेस टुडेने दिलेल्या माहितीनुसार अरूण रसेल मेहता यांची संपत्ती ३ हजार कोटींच्या घरात आहे.
आता वीरेन मर्चेंट होणार मुकेश अंबानी यांचे व्याही
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट या दोघांचा साखरपुडा गुरूवारी पार पडला. राधिकाचे वडील वीरेन मर्चेंट हे आता मुकेश अंबानी यांचे व्याही झाले आहेत. मर्चेंट हे हेल्थकेअर कंपनी Encore चे सीईओ आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ७५५ कोटींच्या घरात आहे. क्लासिकल डान्सर म्हणून आपली ओळख तयार करणारी राधिका मर्चेंट ही आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायातही मदत करते.
मुकेश अंबानींकडे किती आहे संपत्ती?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे श्रीमंतीच्या बाबतीत आपल्या तिन्ही व्याह्यांपेक्षा बरेच पुढे आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार ९०.१ अरब डॉलरच्या नेटवर्थसह मुकेश अंबानी हे जगातल्या श्रीमंतात आठवे तर आशियात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जर मुकेश अंबानी यांच्या व्याह्यांबाबत विचार केला तर तिघांमध्ये सर्वात श्रीमंत आहेत ते अजय पीरामल आहेत.