अॅसिड हल्ल्यातील पीडितेची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, एकतर्फी प्रेमप्रकरण, सूडभावना अशा कोणत्याच कारणामुळे तिच्यावर हल्ला झाला नाही केवळ आई वडिलांच्या भांडणामुळे तिचं आयुष्य कायमचं उद्धवस्त झालं. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक अकाऊंटवरून तिची गोष्ट शेअर करण्यात आली, पण तिचं नाव मात्र गुपितच ठेवलं.
ही तरूणी दोन वर्षांची असताना तिच्या आई वडिलाचं भांडण झालं होतं. सूडभावनेतून वडिलांनी तिच्या आईवर अॅसिड फेकलं, त्यावेळी ही चिमुकली आपल्या आईच्या मांडीवर झोपली होती. काही अॅसिड तिच्याही तोंडावरही पडलं. अॅसिड हल्ल्यात आईचा मृत्यू झाला पण ती मात्र थोडक्यात बचावली. चेहरा विद्रूप झाल्यानं इतर नातेवाईकांनी तिला सांभाळायला नकार दिला आणि तिची रवानगी थेट अनाथश्रमात झाली.
Viral Video : धक्कादायक! ‘हा’ व्हिडिओ पाहून विकृत माणसाची तुम्हाला चीड येईल
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी आपला अनुभव सांगताना ती म्हणली की, ‘त्या दिवसापासून माझं आयुष्य खूपच बदललं. चेहरा विद्रूप झाल्यानं सतत कोणीतरी माझ्याकडे रोखून पाहतंय असं मला वाटायचं, मी एकटी राहू लागली पण कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र मला खूपच वेगळा अनुभव आला. जीवाला जीव देणारा चांगला मित्र परिवार मला भेटला. अॅसिड हल्ल्यामुळे माझ्या डोळ्यांच्या पापण्यांना इजा झाली, त्या आता कधीही बंद होऊ शकत नाही. त्यामुळे झोपताना देखील माझे डोळे उघडे राहतात. अनेकदा मी जागी आहे असं समजून माझे मित्र मैत्रिणी तासन् तास माझ्याशी गप्पा मारायचे पण माझं हे गुपित कोणालाच माहिती नव्हतं. मला नेहमी तपासणीसाठी जावं लागतं. त्यामुळे माझ्या कामावर सतत सुट्ट्या व्हायच्या. यालाच कंटाळून मला नोकरीवरून काढून टाकलं. आता मी दुसरी नोकरी शोधत आहे आणि ती लवकरच मला मिळेल. मी जगण्याची जिद्द अजूनही सोडली नाही’ असं मनोगत तिनं व्यक्त केलं. तिची गोष्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी धैर्यासाठी तिचं कौतुक केलंय.