मागील आठवड्यामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतला आहे. त्यानंतर १७ जुलैला प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी ‘मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल साजरा केला आनंद’ अशी कॅप्शन लिहून तिथे सुरू असलेला एक गरबा व्हीडिओ ट्विट केला. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानी समूहाकडे देण्यात आला आहे. त्याच निमित्ताने हर्ष गोयंका यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. या व्हीडिओत काही तरूण-तरूणी मास्क घालून गुजरचं पारंपारिक नृत्य गरबा करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीच्या संमिश्र प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. हर्ष गोयंका हे आरपीजी इंटरप्रायझेसचे चेअरमन आहेत.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया आणि हजारोंच्या घरात व्हीयुज!

हर्ष गोयंका यांनी २ दिवसांपूर्वी ट्विट केलेला हा व्हीडिओ आत्तापर्यंत २५० हजारापेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. तर १००० लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. राज्यसभेच्या सदस्य प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘मी फक्त सीमा टपारियाजीं यांनाच इथे आनंद घेत असल्याचे पाहू शकते.’ अशी कमेंट केली तर अक्षय भूमकर नावाच्या युजरने शिवसेना, मनसे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या ऑफिशियल अकाऊंटला टॅग करत ‘महाराष्ट्रातील विमानतळ अदानी समूहाकडे गेले म्हणून ते काय गुजरातमध्ये गेले आहे का? हे चालू आहे ते नृत्य कशासाठी हे कशाचे द्योतक आहे? महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आणि राज्य शासनाने यावर तीव्र आक्षेप घेणे अत्यंत गरजेचे आहे.’ अशी प्रतिक्रिया मांडली. हितेश साळवी नावाचा युजर म्हणतो ‘इतका माज कुठून येतो तुमच्यात? आमच्या १०७ हुतात्म्यांनी रक्त सांडलंय, जवळजवळ ६०  कोटी रूपये देऊनही तुमचा मत्सर कमी होत नसेल तर अशा प्रवृत्तीला सडेतोड उत्तर देण्यात येईल.’ समीर शिंगोटे नावाचा एक युजर म्हणतो ‘भीक म्हणून दिलं आहे तुम्हाला कारण तुमचे पोट नीट भरत नाही तुमच्या राज्यात. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात येता, गप्प बसा पैसे कमवा आणि निघा हक्क नका दाखवू नाहीतर माज उतरवला जाईल.’

काय आहे प्रकरण?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतला आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबातात निर्णय घेण्यात आला. याबाबतचं निवेदन कंपनीने प्रसिद्ध केलं आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे ५०.५ टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचं निश्चित झालं होतं. तर कंपनीने आणखी २३.५ टक्के हिस्सा दोन दक्षिण अफ्रिकन कंपन्यांशी करार करून आपल्या नावावार करण्याचा करार केला होता.

या  ट्विटवरती ‘गुजरातने मुंबई ताब्यात घेतलं म्हणजे काय? हे स्पष्टपणे दर्शविते की कोणाची आकलन अधिक चांगले असणे आवश्यक आहे.कुठल्याही कंपनीने कोणताही प्रकल्प हाती घेतल्यामुळे हा मुद्दा काय आहे. उद्या जर आपली कंपनी कुठेतरी ऑपरेशन घेईल तर XYZ ने बंगाल ताब्यात घेतला असे म्हणत लोकांनी याची तुलना केली पाहिजे?’ असा थेट प्रश्न हर्ष गोयंका यांना देवांग दवे या नावाच्या युजरने विचारला आहे.