Mumbai Auto Rickshaw Scam : मुंबईत प्रवासासाठी सर्वांत जलद पर्याय म्हणजे रिक्षा. कुठल्याही ठिकाणी तुमच्या सोईप्रमाणे रिक्षाने लवकर पोहोचता येते. मात्र, मागील काही दिवसांपासून मुंबईत रिक्षाचालकांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. मीटरच्या नावाखाली हे रिक्षाचालक एक नवा स्कॅम करताना दिसतायत. अलीकडेच मुंबई पोलिसांनी रिक्षाचालकांच्या मीटर स्कॅमचा पर्दाफाश केला होता. अशात रिक्षाचालकांचा आणखी एक नवा स्कॅम उघडकीस आला आहे.

एका रिक्षाचालकाने मुंबई एअरपोर्टहून गोवंडीला जाण्यासाठी ५० रुपयांचे भाडे निश्चित केले. मात्र, अर्ध्या रस्त्यात पोहोचताच त्याने प्रवाशाला रिक्षातून खाली उतरवले आणि तो जबरदस्तीने तब्बल २,५०० रुपयांची मागणी करू लागला. धक्कादायक बाब म्हणजे पैसे न दिल्यास त्याला मारहाणीची धमकी देण्यात आली.

याहून थक्क करणारी गोष्ट म्हणजे संबंधित रिक्षाचालकाला यापूर्वीही पोलिसांनी एका स्कॅमप्रकरणी अटक केली होती. पण, त्यातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा प्रवाशांची फसवणूक करणे सुरू ठेवले. पण, या नव्या स्कॅममध्ये या रिक्षाचालकाला प्रवाशाने चांगलीच अद्दल घडवली आहे.

५० रुपयांत गोवंडीला सोडतो सांगू केली फसवणूक

संबंधित घटना ही मुंबईतील टिळकनगर भागातील आहे. त्यात घडले असे की, एक प्रवासी मुंबई एअरपोर्टवरून गोवंडीला जाण्यासाठी रिक्षा शोधत होता. तेव्हा तिथे एक रिक्षाचालक आला आणि त्याने ५० रुपयांत गोवंडीला सोडतो, असे सांगत प्रवाशाला आपल्या रिक्षात बसवले.

रिक्षा अर्धा रस्ता पार करीत टिळकनगर भागापर्यंत पोहोचली. तेथे रिक्षाचालकाने प्रवाशाला खाली उतरण्यास सांगितले. कारण- चालकाला कुर्ला या ठिकाणी जायचे होते. रिक्षाचालकाच्या म्हणण्यानुसार, प्रवासी खाली उतरला आणि ५० रुपये देऊन निघून जात होता. पण, रिक्षाचालकाने त्याची अडवणूक केली आणि तो तब्बल २,५०० रुपयांची मागणी करू लागला. त्यामुळे प्रवासीदेखील गोंधळात पडला. इतक्यात रिक्षाचालकाने आपली माणसे गोळा केली आणि तो प्रवाशाला मारहाणीची धमकी देऊ लागला. अखेर अर्ध्या तासाच्या वादावादीनंतर रिक्षाचालक प्रवाशाकडून ५०० रुपये उकळण्यात यशस्वी झाला.

mumbai auto rickshaw scam
मुंबई ऑटो रिक्षा स्कॅम व्हायरल पोस्ट

रिक्षा स्कॅमबाबत सविस्तर पोस्ट व्हायरल

संबंधित प्रवाशाने रेडिटवर @Litekite567 या अकाउंटवरुन मुंबईतील रिक्षाचालकाच्या या स्कॅमबाबत एक सविस्तर पोस्ट टाकली आहे. त्यात त्याने सांगितलेय की, संबंधित रिक्षाचालकाचे नाव रितेश दशरथ कदम असे आहे, ज्याने ५० रुपयांत मुंबई एअरपोर्टवरून गोवंडीला सोडतो, असे सांगून प्रवाशाला अर्ध्या रस्त्यात उतरवले. नंतर तो प्रवाशाकडून जबरदस्तीने २,५०० रुपयांची मागणी करू लागला आणि पैसे देण्यास नकार देताच त्याने आपली माणसे गोळा करून मारहाणीची धमकी दिली. अखेर अर्धा तास वाद घालून, त्याने प्रवाशाकडून जबरदस्तीने ५०० रुपये वसूल केले.

mumbai auto rickshaw scam
मुंबई ऑटो रिक्षा स्कॅम व्हायरल पोस्ट

त्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगितले की, घरी गेल्यानंतर त्याने संबंधित रिक्षाचालकाविषयी माहितीचा शोध घेतला. तेव्हा त्याला समजले की, या रिक्षाचालकावर पूर्वीदेखील एका स्कॅमप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मुंबई एअरपोर्टवर हा रिक्षाचालक एअरपोर्ट पार्किंग चार्जच्या नावाखाली प्रवाशांकडून ५०० रुपयांची वसुली करायचा. त्यासाठीच मुंबई पोलिसांनी पकडल्यावर त्याला शिक्षा सुनावली गेली होती.

Story img Loader