प्रत्येक अभिनेत्री अभिनेत्यांचे ठरलेले फॅशन डिझायनर असतात. ते त्याच फॅशन डिझायनरकडून कपडे शिवून घेतात किंवा ठराविक एका ब्रँडच्या कपड्यांना पसंती देतात. तेव्हा सेलिब्रिटींचे फॅशन डिझायनर्स आपल्याला चांगलेच परिचयाचे झाले असतील. या सेलिब्रिटींसारखे काही नेतेमंडळी देखील आपल्या कपड्यांबद्दल विशेष सजग असतात. तेव्हा एखाद्या बड्या कार्यक्रमासाठी सूट, सफारी शिवायची असेल तर अनेक नेतेमंडळींची पहिली पसंत असते ती माधव अगस्ती यांना.
नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी रामनाथ कोविंद यांच्यासाठी सूट शिवला होता. एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी देशाच्या राष्ट्रपतींनी आपण शिवलेला सूट घातला ही त्यांच्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब होती. विशेष म्हणजे दोन दिवसांत त्यांनी हा सूट शिवून तयार केला आणि शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत पाठवूनही दिला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या माहितीनुसार, अगस्ती यांनी आतापर्यंत अनेक नेतेमंडळीसाठी सूट शिवले आहेत. जवाहरलाल दर्डा, सुशील कुमार शिंदे, दिवंगत काँग्रेस नेता विलासराव देशमुख यासारख्या अनेक नेत्यांसाठी त्यांनी कपडे शिवले आहेत. प्रत्येक नेतेमंडळीच्या व्यक्तिमत्वानुसार त्यांच्यासाठी कपडे तयार करण्यात अगस्ती यांचा हातखंड आहे. अगस्ती मूळचे नाशिकचे आहेत, काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात ते मुंबईत आले होते. सुरूवातीचे दिवस खूपच बिकट होते त्यावेळी आपण रस्त्यावर झोपूनही दिवस काढल्याचे अगस्ती सांगतात. पण आता मात्र अनेक नेतेमंडळीसाठी सूट शिवणारे अगस्ती सेलिब्रिटी डिझायनर इतकेच प्रसिद्ध झालेत. पहिल्यांदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जवाहरलाल दर्डा यांनी आपल्याकडून सूट शिवून घेतला असल्याच्याही आठवण ते सांगतात.