मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून जगभरात ओळखली जाते. पण येथे येणा-यांसाठी मात्र ती स्वप्न नगरीच असते. दरदिवशी हजारो लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नशीब आजमवण्यासाठी या शहरात येतात. या प्रत्येकाला मुंबईने काहीना काहीतरी दिले आहेच, बाहेरून येऊन स्थिरावलेले अनेक जण इथे कोट्यधीश बनले तर कोणी अब्जधीश. प्रत्येकाला पोटापाण्याचं साधन या नगरीत मिळाले. देशाच्या आर्थिक विकासात या नगरीचा वाटा मोठा आहे. आता या नगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर असल्याचा मान मुंबईला मिळाला आहे.
वाचा : भारतातल्या १% गर्भश्रीमंतांकडे देशातली ५८% संपत्ती..
वाचा : “विमानातल्या सीट्स फुल आहेत, तुम्ही उभ्याने प्रवास कराल का?”
‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ रिपोर्टनुसार देशाची आर्थिक राजधानी आता भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर बनलं आहे. सध्याच्या घडीला मुंबईत ४६ हजार कोट्यधीश आणि २६ अब्जधीश राहतात. भारतातील श्रीमंत शहराच्या यादीत देशाची राजधानी दिल्ली दुस-या क्रमांकावर आहे. दिल्लीत २३ हजार कोट्यधीश तर १८ अब्जधीश राहतात. तर या यादीत बंगळुरू, हैदराबाद, पुणे अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. बंगळुरुमध्ये आठ, हैदराबादमध्ये ६ आणि पुण्यात ५ अब्जाधीश आहेत.
काही दिवसांपूर्वी ऑक्सफेमने एक अहवाल प्रकाशित केला होता. यानुसार १ टक्के भारतीय अब्जाधिशांकडे देशातील जवळपास ५८ टक्के संपत्ती असल्याचे म्हटले होते. या देशात ५८ असे गर्भश्रीमंत आहेत ज्यांकडे देशातील ७० टक्के लोकांकडे मिळून जितकी संपत्ती नसेल त्याहूनही अधिक संपत्ती आहे असे म्हटले होते.