मासेमारी करणाऱ्यांसाठी रोजचा दिवस सारखा नसतो. कधी मासेमारी चांगली झाली तर भरपूर कमाई आणि हाती काहीच लागले नाही तर शून्य कमाई. पण मुंबईतील एका मासेमाराचे नशीब एका रात्रीत फळफळले. त्याच्या गळाला लागलेला मासा विकून या मासेमाराला एक दोन नाही तर तब्बल ५.५ लाख रुपयांची कमाई झाली आहे. घोळ असे या माशाचे नाव असून पालघर येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेला असताना हा मासा मिळाला. हा मासा याठिकाणी दिर्घ काळाने मिळतो, मात्र मिळाल्यावर तो लाखांची कमाई करुन देतो.
शुक्रवारी महेश मेहर आणि त्यांचे भाऊ भरत हे दोघेही आपली छोटी नाव घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले. मुर्बे किनाऱ्याजवळ गेल्यानंतर त्यांना आपले जाळे जड झाल्यासारखे जाणवले. तेव्हा आपल्याला मासा मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जाळे ओढून जवळ घेतले आणि पाहिले तर त्यात घोळ मासा होता. या माशाचे वजन अंदाचे ३० किलो आहे. या दोघा भावांना घोळ मासा मिळाल्याची बातमी काही वेळात सगळीकडे पसरली. ते दोघेही समुद्रकिनाऱ्यावर पोहचेपर्यंत हा मासा खरेदी करण्यासाठी व्यापारांची रांग लागली होती. ते आल्यानंतर त्यांनी या माशासाठी बोली लावली. २० मिनीटे चालू असलेली ही बोली अखेर ५ लाख ५० हजार रुपयांवर थांबली आणि एका व्यापाराने हा मासा खरेदी केला.
हा मासा स्वादिष्ट असून त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने या माशाला विशेष महत्त्व आहे. यामध्ये कोलेजन मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. त्यामुळेच या माशाला आशिया खंडाच्या पूर्व भागात मोठी किंमत मिळते. याच गोष्टीमुळे या माशाला ‘सोने के दिल वाली मछली’ म्हणून ओळखले जाते. हा मासा साधारणपणे सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकाँग याठिकाणी निर्यात केला जातो. या जातीच्या सर्वात लहान माशाची किंमतही ८ ते १० हजार रुपये असते. याआधी भायंदरमध्येही एका मासेमाराला घोळ मासा सापडला होता. त्याची किंमत ५ लाख १६ हजार रुपये आली होती.