सोशल मीडिया स्टार आणि स्टारकिड्सचा बेस्ट फ्रेंड ऑरी ऊर्फ ओरहान अवत्रामणी सध्या खूप चर्चेत आहे. अंबानी कुटुंबीयांची पार्टी असो वा स्टारकिड्सचा वाढदिवस; तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अभिनेत्रींबरोबर फोटो काढणारा ऑरी दिसून येईल. पण, आजही अनेकांच्या मनात ऑरीविषयी अनेक प्रश्न घुटमळत आहेत. तो आहे तरी कोण, प्रत्येक हाय प्रोफाईल पार्टीमध्ये त्याला खास निमंत्रण कसे असते आणि तो तिथे सहजपणे कसा वावरतो, हे अद्याप कोणालाच कळलेले नाही. त्यात ऑरी आता आणखी एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहे. एका कॉलेजमध्ये मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी चक्क ऑरीविषयी एक प्रेझेंटेशन सादर केलंय; ज्यात त्यांनी त्याची देहबोली आणि बोलण्याची स्टाईल समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नवी मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS)च्या मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या गटाने सेलिब्रिटींची देहबोली समजून घेण्यासाठी एका अनोख्या पद्धतीने प्रेझेंटेशन सादर केले. प्रसिद्ध व्यक्तींनी दाखविलेल्या मौखिक आणि अमौखिक संवादाच्या बारकाव्यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑरी ऊर्फ ओरहान अवत्रामणीची निवड करत त्याच्याविषयी एक खास प्रेंझेटेशन दिले. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑरीची देहबोली व हावभावांमागील बारकावे आणि अमौखिक संवादामागील उद्देश समजून घेणे हा या प्रेझेंटेशनचा मुख्य उद्देश होता. यावेळी ऑरीच्या वर्तनाचे विश्लेषण करून, विद्यार्थ्यांनी सेलिब्रिटींच्या वर्तनामागील मानसशास्त्र आणि त्याचा लोकांच्या परसेप्शनवर होणारा परिणाम यांवर प्रकाश टाकला.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तीन विद्यार्थी ऑरीविषयी तयार केलेल्या स्लाइड डेकबाबत स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. यावेळी एक विद्यार्थी ऑरी किती उत्साही, जास्त आनंदी व जास्त व्यक्त होत असल्याचे सांगताना दिसतोय. तसेच ऑरी डोळे आणि हातांची हालचाल करून कशा प्रकारे बोलतो त्यामागचे मुख्य कारण फोटो पोजवरून समजू शकते, असेही तो सांगतो.
त्याशिवाय ऑरी नेहमी डोळ्यांत डोळे घालून बोलतो आणि त्याची देहबोली नेहमी मजेदार अशी असते, असेही त्या विद्यार्थ्याने सांगितले. प्रेझेंटेशनमध्ये ऑरीचे पूर्ण नाव आणि त्याच्या शिक्षणाविषयीही माहिती देण्यात आली होती.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये बरंच काही लिहिलं आहे. एका युजरने, “अमेझिंग वर्क”, असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने आनंदाने लिहिले, “तुम्ही अतिशय अचूक आणि चांगलं उदाहरण निवडलं आहे.”
सेलिब्रिटी स्टार ओरी सोशल मीडियावर सारा अली खान, जान्हवी कपूर, न्यासा देवगण व आलिया भट्ट यांच्यासह बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही मोठ्या सेलिब्रिटींबरोबर दिसतो. इतकेच नव्हे, तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या नुकत्याच झालेल्या प्री-वेडिंग पार्टीतही तो उपस्थित होता. त्या वेळीही ऑरीविषयी बरीच चर्चा रंगली होती.