Mumbai Shivaji Park Shocking Viral Video : मुंबईतले दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क हे मुंबईकरांचे फिरण्याचे हक्काचे ठिकाणी मानले जाते. वृद्धांपासून तरुणांपर्यंत अनेक प्रकारचे लोक तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. विशेषत: मुंबईकर तरुणांना रविवारी आणि सुट्यांच्या दिवसांत खेळण्यासाठी शिवाजी पार्क हे हक्काचे मैदान आहे. या ठिकाणी क्रिकेटसह विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक नोकरी-व्यवसाय करणारे लोक शिवाजी पार्क परिसरातील झाडांखाली विसावा घेताना दिसतात. मात्र, याच परिसरात आता नागरिकांना सुरक्षितपणे फिरण्याचीदेखील भीती निर्माण झाली आहे. कारण- सध्या सोशल मीडियावर शिवाजी पार्क परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात गर्दुल्ले आणि दारूडे खुलेआमपणे लोकांची लूट करताना दिसतोय, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असताना पोलीस कर्मचारी कुठे होते असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवाजी पार्कात गर्दुल्ले आणि मद्यपींची दादागिरी
मुंबईकरांचे हक्काचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी पार्क परिसरात अशा प्रकारची घटना घडणं ही खरंच एक संतापजनक गोष्ट असल्याचे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. छत्रपती शिवाजी पार्क मैदान परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात फेरीवाले, गर्दुल्ले, मद्यपी यांचा वावर दिसून येतो. रात्री अनेक गर्दुल्ले हे या परिसरात झोपलेले असतात. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे फिरणेदेखील भीतीदायक वाटू लागले आहे. त्यात व्हिडीओतही एक गर्दुल्ला रात्रीच्या वेळी खुलेआमपणे
दादागिरी करून एका तरुणाकडील पैसे हिसकावून पळ काढताना दिसतोय.
पार्कातील गर्दुल्ल्यांवर कारवाई कधी?
शिवाजी पार्कात फिरताना तुम्ही पाहिलं असेल की, एक ‘गोल्डन स्टेट मॅन’ हा आपली दररोज सकाळ ते रात्री पूर्ण दिवसभर एका जागी उभा राहून आपली कला सादर करीत असतो. पण, याच ‘गोल्डन मॅन’ची दिवसभराची कमाई घेऊन एका गर्दुल्ल्याने पळ काढला. धक्कादायक बाब म्हणजे दारूसाठी पैसे हवे होते म्हणून त्याने चोरी केल्याचे कबूल केले.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे. यावेळी शिवाजी पार्क परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी आहे. याचदरम्यान एक तरुण गर्दुल्ल्या चोराला पकडून जाब विचारताना दिसतोय. या चोराने दिवसभर उभे राहून पैसे कमावणाऱ्या ‘गोल्डन स्टेट मॅन’ने जमावलेल्या पैशांचा डबा घेऊन पळ काढला. यावेळी एका तरुणाने त्याला पकडले आणि त्याचे पैसे का चोरलेस असा जाब विचारला. ज्यावर चोराने दारूसाठी पैसे हवे असल्याने ही चोरी केल्याचे कबूल केले. यावेळी तिथे लोकांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. तसेच ‘गोल्डन स्टेट मॅन’चे चोरलेले सर्व पैसे आत्ताच्या आता परत करण्यास सांगितले. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून आता तुम्हीच सांगा, मुंबईतील गजबज असलेल्या या ठिकाणी चोरीची घटना घडणं कितपत योग्य आहे, या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे?
गर्दुल्ल्याची अरेरावी
छत्रपती शिवाजी पार्कातील धक्कादायक व्हिडीओ @rajatnaik_21 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, तो दिवस लांब नाही, जेव्हा पार्कातही फिरायची भीती निर्माण होईल… कोणी वाली नाही राहिला हेच बोलावे लागेल.
दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय की, शिवाजी पार्कच्या बाजूलाच पोलीस चौकी आहे, फक्त नावासाठी… दुसऱ्या युजरने लिहिलेय की, हे आजच नाही, नेहमीच होतं. शिवाजी पार्क गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. पार्कातले संरक्षक झोपले आहेत. तिसऱ्याने लिहिलेय की, रात्री अनेक गर्दुल्ले हे पार्कात झोपलेले असतात. पोलिस १२ वाजता सगळ्या नागरिकांना उठवतात घरी जायला सांगतात; पण त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही.
चौथ्याने त्याचा शिवाजी पार्कातील एक वाईट अनुभव शेअर केला आहे. त्याने लिहिलेय की, हो खरं आहे. कडक कारवाई केली पाहिजे या फालतू लोकांवर. आम्हीपण दोन वेळा हे विचित्र वागणं अनुभवलं आहे. तेही सायंकाळी ५ च्या सुमारास. तरी हे गर्दुल्ले मोकाट फिरत आहेत.