बिर्याणी खायला अनेकजण एका पायावर तयार असतात. कोणतीही पार्टी असो किंवा कोणताही क्षण साजरा करायचा असो त्यासाठी लगेच बिर्याणीची ऑर्डर दिली जाते. मागच्या वर्षी झोमॅटोने देशभरात प्रत्येक मिनीटाला बिर्याणीच्या १८६ ऑर्डर्स डिलीवर केल्या आहेत. बिर्याणीचे चाहते भारतात इतके आहेत की त्यासाठी ते काहीही करायला तयार होतील. याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या एका ट्वीटवरून येत आहे. झोमॅटोच्या या ट्वीटवरून असे समजते की मुंबईच्या तरुणीने चक्क बंगळूरच्या हॉटेलमधून बिर्याणी ऑर्डर केली. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
२१ जानेवारी, शनिवारी मुंबईत राहणाऱ्या तरुणीने झोमॅटोवरून बंगळूरमधील ‘मेघना फूड्स’ येथून बिर्याणी ऑर्डर केली. याची डिलीवरी २२ जानेवारी, रविवारी करण्यात आली. ही डिलीवरी मिळताच या तरुणीने सुब्बी नावाच्या ट्विटर अकाउंटवरून तिने दारू पिऊन ही ऑर्डर केल्याचे आणि या ऑर्डरची किंमत २५०० रुपये झाल्याचे सांगितले. पण हे ट्वीट आणि अकाउंट दोन्ही नंतर डिलीट करण्यात आले. झोमॅटोने मात्र या अचंबित करणाऱ्या ऑर्डरची दखल घेत एक ट्वीट केले आहे जे सध्या चर्चेत आहे.
आणखी वाचा: काळ आला होता पण…; व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले ‘यासाठी कृतज्ञता…’
झोमॅटोचे ट्वीट:
झोमॅटोच्या टीमकडुन सुबीला खास मेसेज पाठवण्यात आला आहे. ‘सुबी तुला ऑर्डर मिळताच हँगओव्हर एन्जॉय करशील. हा अनुभव कसा होता हे आम्हाला नक्की कळव’ असे ट्वीट झोमॅटोने केले आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मेघना फूड्सची बिर्याणी सर्वोत्तम असल्याचा रिप्लाय देत सुबीच्या या मद्यधुंद अवस्थेत घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तर बिर्याणीच्या चाहत्यांनी देखील या निर्णयाला पसंती दर्शवली आहे.