स्वप्न जितकी मोठी तितकच त्यापर्यंत पोहोचण्यासाठी अपार मेहनत सोबत असावी लागते. मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीनेही आपल्या डोळ्यात साठवलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक केली आणि एकेकाळी ज्या कंपनीत तो ऑफिस बाॅय म्हणून काम करत होता त्याच कंपनीचा आज तो असोसिएट क्रिएटिव्ह डायरेक्टर बनला आहे. ललित शांताराम साकुरकर असं या मेहनतीच्या जोरावर इथवर पोहोचलेल्या तरूणाचं नाव आहे.
फेसबुकवरील ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या पेजवरून ललितचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. ललितनं स्वत: आपला जीवनप्रवास शब्दांमध्ये मांडला आहे. “आपण अशी स्वप्नच पाहतो जी आपण पूर्ण करू शकतो. मी देखील एका लग्झरीप्रमाणे ते स्वप्न पाहिलं होतं. परंतु माझ्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती उत्तम नव्हती. यामुळेच मी दहावी नंतर शिक्षण सोडलं आणि एका जाहिरात कंपनीत ऑफिस बाॅयचं काम करू लागलो,” असं त्यांनं नमूद केलं आहे.
“मी प्रत्येक ऑफिसप्रमाणे आवश्यक ती कामंही करत होतो. तिथल्या लोकांना कॉफी नेऊन देत होतो, धावत जाऊन प्रिंट्स आणणं, अशी सर्व कामं केली. त्या ठिकाणी तयार करणारी डिझाइन्स पाहून मला खुप आनंद होत होता. अनेकदा ऑफिसमध्ये होणाऱ्या चर्चाही मी ऐकल्या. अनेकदा माझ्याही डोक्यात काही कल्पना आल्या परंतु शिपायाचं कोण ऐकेल, अशी परिस्थिती होती,” असं ललित म्हणतो.
“पण पै पै जोडत मी माझं शिक्षणही पूर्ण केलं. पंरंतु पुन्हा तीन वर्ष कॉलेजला जाऊन आणखी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी आर्ट च्या कोर्ससाठी अप्लाय केलं. सकाळी कॉलेज, त्यानंतर ऑफिस आणि रात्री शिकवणी घेणं अशी माझी दिनचर्या सुरू होती. फार कमी वेळ मला झोप मिळत होती. परंतु यातून मिळणारा आनंद हा मोठा होता,” असंही तो सांगतो.
“शिक्षणादरम्यानच मी एजन्सीमध्ये काही मित्रांसोबत जोडला गेलो. त्याचदरम्यान एका छोट्या जाहिरात एजन्सीमधून मला नोकरीची ऑफर आली. परंतु त्यानंतर मला एक फोन आला आणि माझं जीवनच पूर्णपणे बदलून गेलं. ज्या कंपनीत मी शिपायाचं काम केलं होतं त्याच कंपनीत मला कंटेट रायटर म्हणून नोकरी करण्यासाठी विचारणा झाली. आज माझं प्रमोशन झालंय आणि त्याच कंपनीत मी असोसिएट आर्ट डायरेक्टर म्हणून काम करतोय,” असंही तो खुशीनं सांगतो. “याचदरम्यान माझं लग्नही झाली आणि जीवनातली पहिली बाईकही विकत घेतली. सध्या आम्ही दोघंही बरेच पैसे वाचवतो आणि अनेक ठिकाणी फिरायलाही जातो. एकच सांगू इच्छितो की जगात अशी कोणतीही परिस्थिती नाही ज्या ठिकाणाहून परतून तुम्ही नवी सुरूवात करू शकत नाही. कोणतंही स्वप्न मोठं नसतं केवळ स्वत:वर विश्वास ठेवणं आवश्यक असतं,” असाही मोलाचा सल्ला तो देतो.