Mumbai Local & marathi language Dispute Video : केंद्र सरकारने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मात्र ज्या महाराष्ट्रात अन् मुंबईत मराठी भाषा रुजली, त्याच ठिकाणी मराठी भाषेवरून केल्या जाणाऱ्या अपमानजनक घटना सातत्याने घडत आहेत. एकीकडे मराठी माणसांना मुंबईत घरे नाकारली जातायत, तर दुसरीकडे मराठी माणसांना नोकरीवर घेणार नाही, अशी भूमिका काही परप्रांतीयांकडून घेतली जात आहे. त्यातच मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेविरोधातील संतापजनक घटना समोर आली. या घटनेत मुंबईतील एका रेल्वेच्या तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याने मराठी बोलल्यामुळे एका प्रवाशाला तिकीट नाकारल्याची बाब समोर आली आहे. इतकेच नाही, तर मराठी भाषेचा अपमान केल्यानंतर त्याने माफी मागणार नाही, अशी संतापजनक भूमिका घेतली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय; ज्यात एका परप्रांतीय रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा पाहून संताप व्यक्त केला जात आहे.

यावेळी “मला मराठी येत नाही, तुम हिंदीत बोला, मी माफी मागणार नाही” असे संतापजनक विधानही त्या रेल्वे कर्मचाऱ्याने केले आहे. घटना अशी आहे की, मुंबईतील नाहूर रेल्वेस्थानकावर तिकिट घेणाऱ्या मराठी माणसाने मराठीचा आग्रह धरला. मात्र, तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याने मला मराठी येत नाही, असे म्हणत हिंदीत बोला, असे म्हटल्याने त्या मराठी माणसाचा राग अनावर झाला. या घटनेचा व्हिडीओ मराठी एकीकरण समितीने त्यांच्या सोशल साईट्सवर पोस्ट केला आहे.

December 2024 Bank Holidays : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात १७ दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

या व्हिडीओमध्ये घटनेच्या वेळी रेल्वे कर्मचारी आणि मराठी प्रवाशामध्ये झालेला संवाद रेकॉर्ड करण्यात आला आहे. हाच मराठी प्रवासी मोबाईलमध्ये त्या कर्मचाऱ्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत म्हणतोय, “आता तू मवाळ भाषेत का बोलतोयस; मगाशी हिंदी भाषेत बोलण्यास सांगत होतास” त्यावर तो रेल्वे कर्मचारी “मला मराठी भाषा येत नाही; मग मी कसं बोलणार”, असे म्हणतो. त्यानंतर तो प्रवासी त्याला प्रश्न विचारतो की, “तुझं नाव काय आहे, नावचं बक्कल कुठे आहे?” ज्यावर तो रेल्वे कर्मचारी आधी हसतो आणि नंतर संतापून म्हणतो, “तुम्हाला काही अधिकारी नाही. मी माझं नाव तुम्हाला दाखवून, माझी ओळख विचारण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही”. मराठी प्रवासी पुन्हा त्याला, तुझं नाव काय, असा सवाल करतो. त्यावर रेल्वे कर्मचारी, “तुम्हाला जे करायचे ते करा, रांग लागलीय तुम्ही बाजूला उभे राहा,” असं सांगतो. त्यावर मराठी प्रवासी त्याला, “तू मला हिंदीत बोलायला का लावतोस? तू माझी माफी माग,” असा जाब विचारत, माफीची मागणी करतो. पण रेल्वे कर्मचारी ती मागणी धुडकावून लावत, मी “माफी मागणार नाही,” अशी भूमिका घेतो, तसेच “मला मराठी येत नाही. तुम्ही हिंदीत बोला एवढेच मी बोलतोय,” असे म्हणतो. यावेळी इतर प्रवासीदेखील कर्मचाऱ्याला सांगतात की, सगळ्याच प्रवाशांना हिंदी बोलता येत नाही. इथपर्यंत येऊन व्हिडीओ संपतो.

Story img Loader