Diva Railway Station Viral Video: मध्य रेल्वेवरील ६३ तासांच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबई लोकल उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेने यासाठी पुर्ननियोजन करूनही काही ठिकाणी प्रवाशांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळतेय. ठरवून या कामासाठी वीकेंडच्या कालावधीची निवड करण्यात आली होती मात्र आज महिन्याच्या पहिल्या शनिवारी अनेक कार्यालये सुरु असल्याने ठिकठिकाणी नेहमीइतकीच गर्दी पाहायला मिळत होती. अशातच दिवा स्थानकात घडलेला एक प्रकार सध्या व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. आपण खालील व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दिवा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात लोक ट्रेनच्या प्रतीक्षेत आहेत. जेव्हा अखेरीस ट्रेन स्थानकात येते तेव्हा मात्र असं काही घडतं की फलाटावरील प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होतो.
आपण बघू शकता की, लोकलच्या डब्याचा दरवाजा बंद करण्यात आला होता. यामुळे फार पुढे असलेल्या प्रवाशांना धावत ट्रेन पकडण्याची संधी मिळाली नाहीच पण जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा सुद्धा बराच वेळ दरवाजा उघडला गेला नाही. प्रचंड गर्दीत असा प्रकार घडल्याने संतापलेल्या काही प्रवाशांनी दरवाजा जोरात हात मारत तो उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळे दिवा स्थानकात झालेल्या गदारोळाचा एक लहान व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Video: दिवा स्थानकात गोंधळ, ब्लॉकमुळे लोकल उशिरा आली पण..
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक का आहे?
मध्य रेल्वेच्या वतीने ठाणे येथील ५-६ फलाटांच्या रुंदीकरणाच्या कामानिमित्त गुरूवारी मध्यरात्री १२.३० वाजेपासून रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लाॅक असणार आहे. तर, सीएसएमटी येथे १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजेपासून दुपारी १२.३० पर्यंत ब्लाॅक असणार आहे. त्यामुळे शनिवारी मध्य रेल्वेवरील ५३४ लोकल फेऱ्या रद्द करून रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. याशिवाय रविवारी सुद्धा २३५ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तिन्ही दिवसांच्या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, आज म्हणजे शनिवारी सर्वाधिक प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याने प्रवाशांनी पंचाईत होऊ शकते.
हे ही वाचा<< दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
६३ तासांच्या मोठ्या मेगाब्लॉकच्या वेळी सीएसएमटी – वडाळा रोडदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळ्यादरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे. तर अनेक लोकल भायखळ्याऐवजी दादर, परळपर्यंत चालवण्यात येणार असल्याचे यापूर्वीच मध्य रेल्वेने स्पष्ट केले होते