Thane Railway Station Video: मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकांपैकी दादर, डोंबिवली, कल्याण, सीएसएमटी, अंधेरी ही स्थानके सर्वाधिक गर्दीची मानली जातात. यामध्ये ट्रान्स हार्बरला जोडणाऱ्या ठाणे स्थानकाचा सुद्धा समावेश आहे. गर्दीच्या वेळी ठाणे स्थानकातील विस्तृत पूल सुद्धा तुडुंब भरलेले असतात. ठाण्यातील रेल्वे स्थानकावरील अशाच एका पुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मुंबई रेल्वे प्रवासी संघटना या ट्विटर (X) अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून २०१७ मध्ये एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीची दुर्घटना सुद्धा डोळ्यासमोर येत आहे असेही काहीजण म्हणत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ व ६ येथील पुलावर चढताना अरुंद जिन्यावर लोकांची गर्दी झाली आहे. प्रवाशांचे हे हाल पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. तर प्रवाशांनी सुद्धा रेल्वेला टॅग करून कळवा ऐरोली मार्गिकेचे काम कधी होणार असा प्रश्न केला आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती वर्दळ कमी करण्यासाठी, तसेच कल्याण – नवी मुंबई परस्परांना जोडण्यासाठी कळवा आणि ऐरोलीदरम्यान उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्प हाती घेतला होता. मात्र या प्रकल्पाआड आलेल्या झोपडपट्टीमधील १०८० पैकी ८७१ प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतरास नकार दिल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची चिन्हे धूसर होत आहेत.
Video: ठाणे स्थानकातील धोकादायक प्रकार
हे ही वाचा<< २७ ऑक्टोबरपासून मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास वाढणार! अकरा दिवस २५०० हुन अधिक ट्रेनच्या फेऱ्या रद्द
दुसरीकडे, मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि उपनगरीय गाड्यांचे मार्ग संपूर्ण वेगळे करण्यासाठी करण्यासाठी बोरिवली आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सहावी मार्गिका तयार केली जात आहे. या मार्गिकेचे काम सुद्धा सुरु झाले आहे. मात्र आता कळवा ऐरोली लिंक तयार होईपर्यंत ठाणे स्थानकातील प्रवाशांसाठी काय सुविधा तयार करता येतील याचा विचार व्हायला हवा.