तुम्ही आयुष्यात कधी मुंबईला गेला असाल किंवा नसाल, पण मुंबईशी संबंधित अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील, ज्या पाहून खूप आश्चर्य वाटते. यात मुंबईतील सर्वात धक्कादायक गोष्ट इथल्या लोकल ट्रेनची. मुंबईतील लोकलला शहराची लाइफलाईन म्हटले जाते. या लोकलमधून प्रवास करणे अनेकांना जमतेच असे नाही. यात मुंबईत पहिल्यांदा आलेल्या लोकांसाठी तर ही गर्दी धडकी भरवणारी असते. कामाच्या वेळात मुंबई लोकलमध्ये चढणे अनेकदा खूप अवघड काम असते. लोकलमध्ये चढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. सध्या मुंबई लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्ब्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला ट्रेनमध्ये जीवघेण्या पद्धतीने चढता-उतरताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेकडो महिला प्लॅटफॉर्मवर ट्रेन येण्याची वाट पाहत उभ्या आहेत. यावेळी महिला प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहते. ट्रेन थांबायच्या आधीच अनेक महिला चढण्यासाठी धडपड करतात. यावेळी उतरणाऱ्या महिलांनाही स्वत:चा जीव सांभाळत गर्दीतून वाट काढावी लागतेय. लोकल ट्रेनमध्ये इतकी गर्दी आहे की, प्रवाशांना पाय ठेवायलाही नीट जागा नाही. अशा परिस्थितीतही दररोज अनेक प्रवासी जीव मुठीत घेऊन लोकलमधून प्रवास करतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजले असेल की, ट्रेनमधून चढण्या उतरण्यात काही महिला किती सराईत झाल्या आहेत. शिवाय त्यांचे आयुष्य किती संघर्षमय आहे हेही दिसले असेल.
दररोज अशाचप्रकारे अनेक महिला लोकल ट्रेनमधून जीवघेणा प्रवास करतात. या व्हिडीओतही अनेक महिला ट्रेन थांबण्याच्या आधीच उतरून गर्दीतून बाहेर पडण्यासाठी वाट काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी एकाही महिलेला नीट उभं राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, तरीही एकमेकांनी धक्काबुक्की करत आपल्यासाठी जागा करत चढत आहेत.
@elambar_ostani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबईची ही अशी अवस्था आहे, असे एकाने म्हटले; तर या गर्दीत अनेकांना जीव गमवावा लागला असावा, असे दुसऱ्या युजरने म्हटले आहे. यावर तिसऱ्या एका युजरने म्हटले की, हे दृश्य खूप आश्चर्यकारक आहे.