Mumbai Local Train Garba Video : मुंबई लोकल ट्रेन म्हटलं की, तुफान गर्दी, ट्रेनमध्ये चढण्यासाठी धक्काबुक्की व सीटसाठी सुरू असलेली भांडणं या बाबी आपसूकच डोळ्यांसमोर येतात. पण, सध्या देशभरात नवरात्री सणाचा मोठा प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय. गुजरात, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या स्वरूपात गरब्याचे आयोजन केले जातेय. याच गरब्याचा प्रभाव आता मुंबई लोकल ट्रेनमध्येही पाहायला मिळतोय. ट्रेनमध्ये महिला गरबा खेळताना दिसत आहेत. भरगर्दीतही या महिला गरबा खेळण्याचा आनंद घेताना दिसतायत. ट्रेनमध्ये गरबा खेळणाऱ्या या महिलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहे.

ट्रेनच्या भरगर्दीत महिला कशा खेळल्या गरबा?

मुंबई लोकल ट्रेन नेहमी गर्दी आणि प्रवाशांच्या मारामारीच्या घटनांमुळे चर्चेत असते. पण, आता गरब्यामुळे ही लोकल अधिक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये महिला प्रवासी चक्क ट्रेनच्या मधल्या पॅसेजमध्ये उभ्या राहून गरबा खेळत आहेत. अशा प्रकारे ऑफिसला जाणाऱ्या या महिला ट्रेनमध्येच आपली गरबा खेळण्याची हौस भागवत आहेत. त्यात दोन-चार महिला गोल रिंगण करून, अगदी आनंदात उड्या मारत गरबा खेळल्या. लोकल ट्रेनमधील या अनोख्या गरबा डान्सचा व्हिडीओ @aamchi_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

तुम्ही पाहिलं असेल की, देशात कोणताही सण-उत्सव असू दे; तो मुंबई लोकल ट्रेनमध्ये साजरा होतोच. अगदी दहीहंडी असो, दसरा असो, दिवाळी असो, उत्साही मुंबईकर हे सण लोकलमध्ये आनंदाने साजरा करतात. विशेष म्हणजे यानिमित्ताने लोकल ट्रेनलादेखील हार-फुलांचे तोरण लावले जाते. अशाच प्रकारे नवरात्रीचा सणही लोकल ट्रेनमधील महिला साजरा करताना दिसत आहे.

या गरब्याच्या व्हिडीओवर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी यास पाठिंबा देत हेच ‘मुंबई स्पिरिट’ असल्याचे म्हटले आहे; तर काहींनी याचा त्रास इतर प्रवाशांना कशाला, असे म्हटले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला प्रवासी गर्दी असलेल्या ट्रेनमध्येही जागा करून गरबा खेळत आहेत. यावेळी काही महिला प्रवासी त्यांना प्रोत्साहन देत आहेत; तर काही महिला प्रवासी गप्प बसून त्यांचा डान्स पाहत आहेत. ज्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसते, तिथे या महिला गरबा कसा खेळतायत, असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र, तरीही या महिला गरबा खेळताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटतेय.

दरम्यान दुसऱ्या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाच्या साड्या नेसून काही महिला मुंबई लोकल ट्रेनच्या दरवाजा जवळच्या स्पेसमध्ये गोल रिंगण करुन आनंदाने गरबा खेळत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ वाशी रेल्वे स्थानकादरम्यानचा आहे.

हेही वाचा – Desi Jugaad : ऑनलाइन मुलाखत पास होण्यासाठी तरुणीचा भन्नाट जुगाड, कॉम्प्युटवर चिकटवला मोबाईल अन्…; पाहा Video

मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांनी घेतला गरब्याचा आनंद

लोकलमधील महिला प्रवाशांचा गरबा डान्स पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मला वाटलं की, सीट मिळाली म्हणून आनंदानं त्या नाचतायत की काय? दुसऱ्या एका युजरने लिहिले की, मुंबईकरांमध्ये गरब्याचा हाय फिवर पाहायला मिळतोय. तर तिसऱ्या युजरने लिहिलेय की, अशा प्रकारे सकाळच्या वेळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये गरबा खेळून दाखवा. तर काहींनी, जरा विरार लोकलमध्ये येऊन असा गरबा खेळून दाखवा, असे चॅलेंज दिले आहे. काहींनी, हे सर्व मुंबईतच होऊ शकतं, असे म्हणत, यालाच तर मुंबई बोलतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.