Virar Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये वर्षाचे ३६५ दिवस नेहमी गर्दी असते. त्यात विरार लोकलबाबत तर विचार करायचीही सोय नाही. सकाळ असो वा संध्याकाळ, विरार लोकलमध्ये पाय ठेवायला जागा मिळणे म्हणजे नशीब. सकाळच्या वेळात विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये सीट तर दूरची गोष्ट; चढायला मिळणेही कठीण कर्म करण्यासारखे असते. अशा परिस्थितीत अनेक प्रवासी लोकलने नालासोपारा डाऊन करीत चर्चगेटच्या दिशेने जातात; ज्यामुळे विरार स्थानकावर चढणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी सीट्स शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे नालासोपारा रिटर्न करणाऱ्यांना कंटाळलेल्या विरारकर प्रवाशांनी एक शक्कल लढवली आहे. प्रवाशांनी नालासोपारा स्थानकावरून डाऊन करणाऱ्या महिला आणि मुलींना एक मजेशीर विनंती केली आहे. या विनंतीचे एक पोस्टर आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे पोस्टर पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे पोस्टर हास्यास्पद वाटत असले तरी पोस्टरमधून जी विनंती केली गेली आहे, ती अतिशय भावनिक आहे. कारण- विरार लोकमधून रोज शेकडो महिला प्रवासी प्रवास करतात; ज्यांना अगदी विरारपासून दादर येईपर्यंत काही तास गर्दीत धक्के सहन करीत उभे राहून प्रवास करावा लागतो. विरार स्थानकावर लोकल खाली होत असूनही नालासोपारा डाऊन करणाऱ्यांमुळे अनेकांना बसायला मिळत नाही. रोजच्या या समस्येला कंटाळलेल्या महिला प्रवाशांनी विरार लोकलमध्येसीट मिळण्यासाठी मजेशीर पोस्टर चिकटवले आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, लोकलच्या एका डब्यात एक पोस्टर चिकटवल्याचे दिसते आहे. या पोस्टरवर नालासोपाऱ्यातील महिला आणि मुलींना विनंती करीत लिहिलेय की, खासकरून नालासोपारा डाऊन महिला आणि सर्व मुलींसाठी, कृपया माणुसकी म्हणून तुमच्यासमोर उभ्या असतील त्यांना बसायला द्यावे. -आदेशावरून सर्व कामकाजी महिलाप्रवासी. दरम्यान, हे पोस्टर आता सोशल मीडियावर खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण- लोकलमधील सीटसाठी अशा हटके प्रकारे विनंती करण्याची ही पहिलीच वेळ असावी.

दरम्यान, विरार लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी रोजचीच आहे. ऑफिस, कॉलेज आणि कामाच्या ठिकाणी सकाळी वेळेत पोहोचण्यासाठी धावत्या लोकलमध्येच लोक चढायला सुरुवात करतात. त्यानंतर लोकल थांबते तेव्हाही चढण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. विरारप्रमाणे अनेक स्थानकांवरही हीच परिस्थिती असते. लोक एकमेकांना धक्काबुक्की करीत स्वत:साठी जागा करीत असतात. ही लोकल ट्रेन मुंबईकरांच्या दररोजच्या जगण्याचा भाग म्हणजे जीवनवाहिनी (लाइफलाइन) झाली आहे. लोकलमध्ये बसायला दूर; पण निदान उभे राहायला तरी जागा मिळावी एवढीच या लोकांची किमान अपेक्षा असते.

“कॅज्युअल राहावे, पण…”, मुंबई पोलिसांचे नवे ट्वीट व्हायरल; फोटो शेअर करीत सांगितली ‘ही’ महत्त्वाची गोष्ट

दरम्यान, dimplewalii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, नालासोपारा रिटर्न करणाऱ्यांना कंटाळलेल्या विरारच्या प्रवाशांची आयडियाची कल्पना. या व्हिडीओवर अनेक युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी पोस्टरमधील मराठी व्याकरणाच्या चुका काढल्या आहेत; तर काहींना ही कल्पना फार आवडली असून, त्यांनी लोकलमधील पुरुषांच्या डब्यातही अशी पोस्टर्स लावली पाहिजेत, असा विचार व्यक्त केला आहे. त्यात काहींनी विरार लोकलमधील प्रवासादरम्यानच्या अडचणी शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train jugaad for seat in virar local women passengers put up posters saying nalasopara return down ladies and girls sjr