Mumbai Local Ticket Checking Campaign: मागील काही दिवसांपासून मुंबईत अनेक रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणाऱ्या टीसींची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कधी बांद्रा, कधी अंधेरी- बोरिवली तर कधी दादर- ठाणे अशा विविध ठिकाणी आतापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली होती आणि आता मध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात सुद्धा ही टीसींची मोठी तुकडी सज्ज करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या X (पूर्व ट्विटर) अकाउंटवर या विषयी माहिती देण्यात आली असून रेल्वेने तिकीट तपासण्याच्या मोहिमेचे काही फोटो व व्हिडीओ शेअर करत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना तंबी सुद्धा दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर केलेल्या पोस्टमध्ये अगदी फिल्मी अंदाजात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे कान पिळले आहेत. “तुम हमसे फिर से छुप रहे हो… और हम तुम्हारा स्टेशन पे फिर से इंतजार कर रहे हैं!” असं म्हणत मध्य रेल्वेने प्रवाशांना अगोदरच सूचना सुद्धा दिली आहे. कालच्या दिवसात म्हणजेच १६ ऑक्टोबर २०२३ ला एकाच दिवसात कल्याण स्थानकात तब्बल ४४३८ विनातिकीट प्रवासी सापडले होते ज्यांच्याकडून जवळपास १६ लाख ८५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल १६७ टीसींची फौज कल्याण स्थानकात उपस्थित होती यांच्यासह ३५ आरपीएफ कर्मचाऱ्यांची टीम सुद्धा जाळ्या स्थानकात सतर्क होती. प्रत्येक टीसीने या कालावधीत सरासरी २७ विनातिकीट प्रवाशांना पकडले असून प्रत्येकाने सरासरी १० हजाराहून अधिकचा दंड वसूल केला आहे.

हे ही वाचा<< याला म्हणतात कामगिरी! मुंबईतल्या टीसीने सहा महिन्यात वसुल केला १ कोटींपेक्षा जास्त दंड, मध्य रेल्वेकडून कौतुक

दुसरीकडे, पश्चिम रेल्वेने एप्रिल – सप्टेंबर २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमेतून १२.६३ लाख विनातिकिट प्रवाशांना पकडून ८१.१८ कोटी रुपये दंड वसूल केला. पुढील काही दिवस ही मोहीम इतरही ठिकाणी कायम राहणार आहे. प्रवाशांनी अगोदरच योग्य तिकीट काढून प्रवास करावा अशी सूचना रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local train kalyan station raided by ticket checking campaign never make these mistakes while travelling in mumbai svs