Mumbai Local Train Shocking Video : मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो लोक नोकरी, धंदा, शिक्षणासाठी मुंबई लोकलने प्रवास करतात. मुंबई लोकल ठप्प झाली की, मुंबईचे आर्थिक गणित बिघडते. पण, मुंबई लोकलने प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा चांगले-वाईट अनुभव येत असतात. नेहमी गर्दीमुळे चर्चेत असणारी मुंबई लोकल हल्ली मात्र अनेक धक्कादायक, विचित्र घटनांमुळे चर्चेत असते. सध्या मुंबई लोकलमधील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक नशेबाज तरुण महिलांच्या डब्यात चढून धिंगाणा घालताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
मद्यधुंद तरुणाने केले होते ड्रग्सचे सेवन
चुनाभट्टी रेल्वेस्थानकावर ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ च्या सुमारास मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात एक मद्यधुंद तरुण महिलांच्या डब्यात शिरला. यावेळी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या महिला त्याला पाहून घाबरल्या. मात्र, एका महिलेने पुढे येत त्याला चांगले फटकारत व्हिडीओ शूट करून, तो सोशल मीडियावर शेअर केला. त्या मद्यधुंद तरुणाने ड्रग्सचे सेवन केल्याचा आरोपही महिलेना केला आहे.
नशेबाज तरुण महिलांच्या डब्यात थुंकला अन्
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक मद्यधुंद अवस्थेतील तरुण ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात शिरून धिंगाणा घालतोय. त्याने इतकी नशा केली होती की, त्याला धड उभंही राहता येत नव्हतं, ना धड नीट बोलता येत नव्हतं. अशा अवस्थेत तो महिलांच्या डब्यात जोरजोरात ओरडत, महिलांकडे पाहत फिरू लागला. त्यामुळे महिला खूप घाबरल्या. नाकाला रुमाल लावून तो नशा करत होता, जे पाहून एक महिला पुढे आली आणि तिने त्याला चांगले फटकारले, तसेच व्हिडीओ शूट करीत नशेबाज तरुणाला पुढील स्थानकावर उतरण्यास सांगितले. व्हिडीओमध्ये तो तरुण महिलांच्या डब्यात थुंकला. त्यानंतर तो कॅमेऱ्याकडे पाहून तो हातवारे करू लागला. इतक्यात पुढील गुरू तेग बहादूर रेल्वेस्थानक येताच डब्यात उपस्थित महिलांनी त्याला खाली उतरण्यास भाग पाडले.
मुंबई लोकल ट्रेनमधील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ @Manasisplaining नावाच्या महिलेने तिच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट केला आहे. तिने या व्हिडीओबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले की, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एक तरुण ट्रेनच्या महिलांच्या डब्यात घुसला आणि आरडाओरडा करू लागला; जे पाहून महिला खूप घाबरल्या, तो तरुण ट्रेनच्या आत हिंडू लागला.
या महिलेने पुढे सांगितले की, तो त्याच्या खिशात ठेवलेला रुमाल नाकाला लावून नशा करत होता. महिलांनी त्याला ट्रेनच्या दाराजवळ उभे राहण्यास सांगितले आणि पुढील स्थानक गुरू तेग बहादूर (GTB) नगर स्टेशन होते, तेथे उतरण्यास सांगितले.या घटनेची माहिती सोशल मीडियावर रेल्वे सेवेकडे पोहोचताच त्यांनी या प्रकरणी मध्य रेल्वे संरक्षण दलाला योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
पण या घटनेमुळे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. कारण- काही दिवसांत अशा अनेक अनुचित घटना घडल्या आहेत. अशाच एका घटनेत एक पुरुष पूर्णपणे नग्नावस्थेत महिलांच्या गाडीत घुसला. ज्यानंतर महिलांनी तिकीट कलेक्टरला बोलावले, ज्याने त्या व्यक्तीला ट्रेनमधून बाहेर काढले.