Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेन आज मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. कारण- रोज लाखो मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट लोकल ट्रेनच्या प्रवासाने होते. गर्दी, धक्काबुक्की, भांडण अशा अनेक गोष्टी सहन करीत मुंबईकर आपल्या कामाचे ठिकाण गाठतात. अनेक लहान-मोठ्या फेरीवाल्यांचे पोट या मुंबई लोकलवर अवलंबून आहे. त्यामुळे नाइलाजास्तव अनेक मुंबईकर लोकलच्या गर्दीतून प्रवास करतात. याच लोकलच्या जीवघेण्या प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो बघून मुंबईकरांचं हे जगणं आहे की मरणं, असा प्रश्न पडेल.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत गर्दीच्या वेळी मुंबईकर ट्रेनच्या दरवाजाला, तर कधी ट्रेन डब्याबाहेरील अगदी छोट्याशा जागेत लटकून प्रवास करीत असल्याचे भयानक दृश्य दिसतेय. पण हेच मुंबईकरांचं रोजचं जगणं आहे. कितीही गर्दी असो, धक्काबुक्की होवो; पण ट्रेनमध्ये चढण्यासाठी जागा मिळवायचीच हे मुंबईकरांचं रोजचं लक्ष्य असतं आणि हे ज्याला जमलं, तोच मुंबईत प्रवास करू शकतो; पण काहींना ते शक्य होत नाही. अशा वेळी ते जीवघेणे मार्ग शोधून काढतात. असाच एक जीवघेणा मार्ग एका प्रवाशाने शोधल्याचे या व्हिडीओमध्ये दिसतेय. व्हिडीओत प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यास न मिळाल्याने कामाचे ठिकाण गाठण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसतोय. हे दृश्य मुंबई लोकल प्रवासाच्या भयानक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे आहे.
मुंबईकरांच्या जगण्या-मरण्याचा खेळ
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, प्रवाशांनी गच्च भरलेली एक ट्रेन वेगाने धावतेय. यावेळी ट्रेनच्या दरवाजावर अनेक जण अक्षरश: लटकल प्रवास करतायत. यावेळी तिथे धड उभेही राहणे कठीण होतेय; पण तरीही तेथे अनेक प्रवासी कसातरी स्वत:चा तोल सांभाळून उभे आहेत. त्यात चुकूनही एकाचा जरी हात सुटला तरी तो जीवाशी मुकू शकतो. पण, तरीही मुंबईकरांना जीवावर उधार होऊन असा प्रवास करावा लागतो. व्हिडीओत एका व्यक्तीने ट्रेनमध्ये चढण्यास जागा न मिळाल्याने दरवाजाच्या मागे असलेल्या एका रॉडवर लटकून प्रवास केला. इतकेच नाही, तर ट्रेनच्या बंद दरवाजावरही काही जण धोकादायक पद्धतीने लटकत उभे आहेत.
मुंबई लोकल प्रवासाची भीषण परिस्थिती दाखविणारा हा व्हिडीओ me_ghatkoparkar
नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर अनेक जण कमेंट्स करीत मुंबई लोकल प्रवासाचे अनुभव सांगत आहेत. एकाने लिहिले की, भावा, लोक मुंबईत अशाच प्रकारे रोज जीवाशी खेळून कामावरती जातात. दुसऱ्याने लिहिले की, ये है मुंबई मेरी जान. तर, अनेकांनी मुंबईकरांना अशा जीवघेण्या पद्धतीने प्रवास न करण्याची विनंती केली आहे.