Mumbai Local Train Viral Video : मुंबई शहर कधीच कोणासाठी थांबत नाही, असं म्हणतात. सकाळच्या पहिल्या ट्रेनपासून ते अगदी शेवटच्या ट्रेनपर्यंत प्रवाशांचा प्रवास सुरू असतो. छोट्या-छोट्या गोष्टी विकून पोट भरणारे ते घरातलं आवरून नोकरीसाठी धावपळ करणारे तुम्हाला अनेक जण दिसून येतील. हे सगळं असलं तरीही कुठेतरी या ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) सुंदर क्षण सुद्धा अनुभवायला मिळतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण भजन सादर करताना दिसला आहे.
तुम्ही पहाटे मुंबई लोकलमधून प्रवास (Mumbai Local Train) केलात तर तुम्ही पुरुषांच्या डब्यातून ऐकू येणारा भजनाचा आवाज ऐकला असेल. टाळ, सुरेल आवाज आणि हाताच्या टाळ्यांचा गजरात हे भजन अगदी भक्तिभावाने गायले जाते. तर मुंबई लोकल ट्रेनने बोरिवली ते चर्चगेट दरम्यान प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा सुंदर भजन गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशांची ट्रेनमध्ये गर्दी आहे आणि या गर्दीत तरुण ‘तुझ्यासाथी आले वनात कान्हा’ भजन गाताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओतील भजन तुम्हीसुद्धा नक्की ऐका.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुण भगवान कृष्णाचे कौतुक करत भक्तिगीत गाताना दिसत आहे.त्याने केवळ गाण्याचे बोल सुरेखपणे सादर केले नाहीत तर त्यांच्या प्रभावी गायन कौशल्याने भजनाला संगीतमय स्पर्शही दिला आहे. ज्यामुळे इतर प्रवासी सुद्धा मंत्रमुग्ध झाले आणि त्याच्या आजूबाजूचे काही प्रवासी त्याच्याबरोबर भजन गाण्यात सामील झाले. हातांनी टाळ्या वाजवत, कोणी टाळ वाजवत तर मांड्यावर हात वाजवून अनेकांनी भजन गाण्यात तरुणाला साथ दिली.
भाऊ ट्रेन, टाईम आणि डब्बा सांग
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @borivali_churchgate_bhaja या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ६६,००० हुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या तरुणाच्या आवाजाचे भरभरून कौतुक केलं आहे. तसेच एका युजरने भजन ऐकण्याची इच्छा व्यक्त करत ‘भाऊ ट्रेन, टाईम आणि डब्बा सांग’ अशी कमेंट केली आहे. तसेच भजन सादर करणाऱ्यांचे युट्युबला स्वतःचे चॅनेल सुद्धा आहे आणि या चॅनेलचे नाव “बोरिवली चर्चगेट भजन” असे ठेवण्यात आले आहे.