Mumbai Local Train Viral Video : घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी मुंबई लोकल ट्रेन मोठा आधार आहे. सकाळी कामाच्या वेळी एक ट्रेन जरी चुकली तरी पुढे त्यांचे संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक बिघडते. ऑफिस, कॉलेज, कामाधंद्याच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होतो, त्यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे लोकल ट्रेन रोज ठरलेल्या वेळापत्रकानुसारच धावाव्यात असे मुंबईकरांना वाटत असते. मात्र, काही वेडसर लोकांच्या कृत्याने अनेकदा या सेवेत अडथळा निर्माण होतो. असाच काहीसा प्रकार माहीम रेल्वेस्थानकात घडला.

रेल्वे ट्रॅकवर मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा

इथे एका मद्यधुंद व्यक्तीने रेल्वे ट्रॅकवर उडी मारली त्यानंतर पुढे त्याने असा काही धिंगाना घातला की पाहून प्रवासी देखील संतापले. एका व्यक्तीच्या चुकीमुळे काही वेळासाठी लोकल ट्रेन थांबली ज्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मद्यधुंद व्यक्ती ट्रेनवर चढला अन् पुढे…

माहिम रेल्वे स्थानकात सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि नेमका त्याचवेळी एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर उतरला आणि त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रेल्वे ट्रॅकवर उतरल्यानंतर तो तिथेच थांबला नाही तो चक्क लोकल ट्रेनवर चढला. यावेळी ट्रेनच्या लोको पायलटने त्याला काठीने मारुन खाली उतरण्यास सांगितले, पण तो व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याने तो काय वागत होता याचे भानच त्याला नव्हते. तो ट्रेनवरुन काहीवेळाने खाली उतरला नंतर पटरीवर उभं राहत वेडेचाळे करु लागला, नंतर हातात काठी घेत ट्रॅकवर बसून राहिला. स्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही त्याला बाजूला हटण्यास सांगितले पण तो कोणचेही ऐकत नव्हता. यावेळी स्टेशनवर उपस्थित प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात ही सर्व घटना रेकॉर्ड करत सोशल मीडियावर पोस्ट केली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या घटनेवेळी रेल्वे पोलीस कुठे होते असा सवाल उपस्थित केला आहे. तर काहींनी या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. @chal_mumbai नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर आता लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “याच अशा लोकांमुळे ट्रेन लेट होतात.’ दुसऱ्या एका युजरने सवाल केला की, घटनेवेळी आरपीएफ आणि जीआरपीएफ जवान कुठे होते. तिसऱ्याने लिहिले की, पोलिसांनी चांगलाच चोप दिला पाहिजे, म्हणजे झोपेतपण असं करणार नाही. अशाप्रकारे कमेंट्स करत लोक आपला संताप व्यक्त करत आहेत.

Story img Loader