Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कधी मुसळधार पाऊस, कधी तांत्रिक बिघाड, तर कधी इतर काही कारणांमुळे ट्रेन उशीर धावतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना जीवघेण्या गर्दीतून प्रवास करावा लागतो. खरे तर आता मुंबईकरांना रोजचा हा त्रासदायक प्रवास नकोसा वाटू लागला आहे; पण पोटा-पाण्यासाठी आणि शिक्षणासाठी म्हणून रोज अनेक मुंबईकर नाइलाजाने लोकलच्या गर्दीत उभे राहून प्रवास करतात. त्यात लोकल ट्रेनने प्रवास करताना सीट मिळणे म्हणजे फारच अवघड बाब असते. धावत-पळत धक्काबुक्की करून ट्रेनमध्ये चढूनही सीट मिळेल याची काही गॅरेंटी नसते. अशा वेळी सीट न मिळाल्याने अनेक प्रवाशांना तास-दीड तास गर्दीत उभे राहून प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई लोकलने प्रवास करताना काय हाल होते हे फक्त एक मुंबईकरच चांगल्या प्रकारे सांगू शकतो. अशात सोशल मीडियावर मुंबई लोकलमध्ये चढणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही प्रश्न उपस्थित कराल की, मुंबईकरांनो खरंच जीव एवढा स्वस्त आहे का? कारण- या व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेनमध्ये सीट लवकर सीट मिळविण्यासाठी जी धडपड करतोय, ती खरंच जीवघेणी आहे.
मुंबई लोकलमधील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात काही ठराविक वेळेत ट्रेनमध्ये इतकी गर्दी असते की, प्रवाशांना नीट पाय ठेवायला तर सोडाच, पण श्वास घेण्यासाठीही जागा नसते. पण, तरीही नोकरीच्या निमित्ताने प्रवास करण्यासाठी मुंबई लोकलशिवाय दुसरे कोणते जलद आणि स्वस्त पर्याय नसल्याने लोक रोज मुंबई लोकलवर अवलंबून असतात. परिणामी लोकलवरील ताण वाढत जातोय. या व्हिडीओमध्येही एक तरुण ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच प्रवाशांची गर्दी लक्षात घेत, ट्रेनमध्ये सीट मिळवण्यासाठी जीवघेण्या पद्धतीने चढताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर नुकतीच येऊन थांबतेय, यावेळी शेकडो प्रवासी ती ट्रेन पकडण्यासाठी धाव घेतात. काही जण चालत्या ट्रेनमध्येच उडी घेत सीट्स पकडतात. तर काही धक्काबुक्की करीत कसं तरी ट्रेनमध्ये शिरतात. पण, याचदरम्यान एक तरुण मात्र प्लॅटफॉर्मवरून ट्रेन न पकडता, थेट रुळावर उतरून ट्रेनच्या दुसऱ्या बाजूला येतो आणि तिथल्या दरवाजाने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. पण, एका हातात छत्री असल्याने त्याला ट्रेनमध्ये त्याला सहजपणे चढायला जमत नाही. एकदा प्रयत्न करतो, दोनदा करतो, तिसऱ्या करतो, चौथ्यांदा करतो; पण त्याला काही ट्रेनमध्ये चढता येत नाही. अखेर असे अनेक प्रयत्न करून तो कसाबसा ट्रेनमध्ये चढतो; पण इतके प्रयत्न करून त्याला सीट काही मिळत नाही. ही झाली एक घटना; पण रोज अनेक मुंबईकर अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून ट्रेनमध्ये चढताना दिसतात.
ट्रेनमध्ये सीट मिळाण्यासाठी तरुणाची धडपड
हेही वाचा – बाई sss हा काय प्रकार! बसमध्ये मोठ्याने गाणी ऐकणाऱ्या तरुणावर भुंकू लागली तरुणी; video पाहून युजर्स म्हणाले…
पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर गर्दीच्या वेळी लोक अशा जीवघेण्या पद्धतीने प्रवास करताना दिसतात. मुंबई लोकलसंदर्भातील हा व्हिडीओ mumbai_a_2_z नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्यात. एका युजरने लिहिले की, आमच्या इथे असंच असतं, दुसऱ्य युजरने लिहिले की, हा भाऊ लवकर जाण्याच्या नादात सगळ्यात उशिरा पोहोचला. तिसऱ्या युजरने लिहिले की, एक विरारकरच असं करू शकतो.