Passengers Singing Yeh Dil Deewana On Mumbai Local: धावपळीचं जीवन जगणाऱ्या मुंबईकरांच्या गोष्टीत मुंबई लोकलचं (Mumbai Local) पहिलं स्थान आहे, असे म्हणायला हरकत नाही. जिथे लोकलमध्ये चढण्यासाठी धडपड, सीटवर बसण्यावरून मारामारी ते भजन, गाणी म्हणून सगळ्यांचा प्रवास सुखकर करणारे अनेक प्रवासीसुद्धा आहेत. तर आज सोशल मीडियावर मुंबई लोकलचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये पुरुषांच्या डब्यात काही प्रवाशांनी मिळून ९० च्या दशकातील सोनू निगमचं गाणं सादर केलं आहे. हा व्हिडीओ पाहून गायक सोनू निगमनंही त्याचं कौतुक केलं आहे.
शाहरुख खानचा १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परदेस’ चित्रपटातील ‘ये दिल दिवाना’ हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. हे गाणं सोनू निगम या गायकानं गायलं होतं. पण, आज मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एक ग्रुप हे गाणं सादर करताना दिसला आहे. त्यांचा आवाज, त्यांची गाणं म्हणण्याची स्टाईल, वाद्य म्हणून खिडकीची घेतली जाणारी मदत, इतर प्रवाशांची साथ या गाण्याला आणखीनच वेगळ्या स्तरावर घेऊन गेली आहे. मुंबई लोकलच्या प्रवाशांनी गायलेलं ये दिल दिवाना हे गाणं तुम्हीसुद्धा नक्की ऐका.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मुंबई लोकलमधील (Mumbai Local) प्रवाशांचा हा ग्रुप बॉलीवूडचं हे गाणं उत्तमरीत्या सादर करीत आहे. इतर प्रवासीसुद्धा टाळ्यांच्या गजरात गाणं म्हणत त्यांना साथ देताना दिसत आहेत. काही जण तर हे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्येही शूट करून घेत आहेत. तर अनेक जण प्रवाशांचा हा मंत्रमुग्ध आवाज ऐकून त्यांच्याकडे एकटक पाहताना दिसत आहेत. तुम्हीसुद्धा हे सादरीकरण पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघाल एवढं नक्की.
इन्स्टाग्राम युजर आयुषने हा व्हिडीओ त्याच्या या @the_minihaboo इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच ‘कला सर्वत्र तिचं स्थान शोधते’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. सोनू निगमनंही या व्हिडीओवर “किती सुंदर. मला व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला. देव सर्वांचं कल्याण करो”, अशी कमेंट केली आहे. एकूणच मुंबई लोकलमधील या दृश्यानं आणि प्रवाशांनी सादर केलेल्या त्या गाण्यानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. तसेच अनेक नेटकरी या खास क्षणाचे साक्षीदार होण्याची इच्छा कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत.