तुमच्यापैकी अनेक जण खासगी बसने प्रवास करीत असतील. एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा शहरातल्या शहरात किंवा शहरातून गावी जाण्यासाठी खासगी बसचा वापर केला जातो. पण, अनेकदा काही खासगी बसचालक खराब रस्ता, ट्रॅफिक किंवा अपघाताचे कारण पुढे करीत तुम्हाला काही किलोमीटर आधीच उतरवून निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. अशाच प्रकारे एका खासगी बसचालकाला मुंबईतील प्रवाशाला काही किमी आधीच खाली उतरवणे खूप महागात पडले आहे. या प्रकरणी संबंधित ट्रॅव्हल कंपनीवर गुन्हा दाखल करून ग्राहक न्यायालयाने प्रवाशाला दोन लाखांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रकरण २०१८ सालचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके प्रकरण काय?

मुंबईत राहणारे ६९ वर्षीय शेखर हट्टंगडी यांनी २०१८ साली एका खासगी ट्रॅव्हल कंपनीकडून सुरत ते मुंबईसाठी ७४५ रुपयांचे बसचे तिकीट काढले होते. मात्र, घरी परतताना बसचालकाने त्यांना ५० किलोमीटर आधीच बसमधून खाली उतरवले. यावेळी शेखर यांनी याबाबत ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला होता; ज्याचा निर्णय त्यांच्या बाजूने लागला आहे.

शेखर हट्टंगडी यांनी Travekyaari या वेबसाइटवरून हे ऑनलाइन तिकीट बुक केले होते. त्यावर शेखर म्हणाले की, त्यांना योग्य पिकअप पॉइंट सांगण्यात आला नव्हता. अशा परिस्थितीत त्यांना ५० किमी आधी बसमधून खाली उतरण्यास भाग पाडण्यात आले. विविध कारणे सांगून त्यांना मुंबईबाहेरील एका ठिकाणी बसमधून खाली उतरवले.

कंपनीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ

शेखर हट्टंगडी यांनी तक्रार दाखल केली असता, त्यांना सांगण्यात आले की, अहमदाबाद-मुंबई महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे बस मुख्य महामार्गावरून दुसऱ्या मार्गे वळवण्यात आली. त्यावर शेखर यांचे म्हणणे आहे की, पावलो ट्रॅव्हल्सने त्यांना मार्गातील बदलाबाबत कोणतीही माहिती दिली दिली नव्हती. यावेळी मॅन्टिस टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने ईमेलद्वारे त्यांची माफी मागितली; परंतु त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेतली नाही.

VIDEO : मुंबई लोकलमध्ये सीटसाठी जुगाड, महिला प्रवाशांनी लावले पोस्टर, लिहिले, “नालासोपारा डाऊन लेडीज अन्….”

शेखर यांच्या तक्रारीनंतर स्थानिक ग्राहक न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देताना सांगितले की, तक्रारदाराला त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचणे आवश्यक होते. संबंधित तक्रारदार ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना या गोष्टींमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास झाला. त्यामुळे तक्रारदाराला नुकसानभरपाई मिळण्याचा अधिकार आहे.

या प्रकरणी आता स्थानिक ग्राहक न्यायालयाने मॅन्टिस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, पावलो ट्रॅव्हल्स प्रा. लि, मायरोन परेरा आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेखर हट्टंगडी यांना दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच आयोगाने त्यांना कोर्ट फायलिंग आणि वाहतूक खर्चासाठी अतिरिक्त दोन हजार रुपये देण्याचेही निर्देश दिले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai man wins rs 2 lakh compensation from travel company for dropping him 50 km away from city report sjr