Thane Railway Station Viral Video : मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना आत पाऊल ठेवणे कठीण होते. अनेक लोक ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतात. यात काल झालेल्या वादळी पावसामुळे सर्वच रेल्वेस्थानकांवर अचानक मोठी गर्दी दिसून आली. अशा परिस्थितीत रेल्वेस्थानकावर मिळेल ती ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. याचवेळी ठाणे रेल्वेस्थानकावर एक थरारक घटना घडली. ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची धडपड सुरू होती, याचवेळी महिला डब्याजवळ एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेनखाली अडकली. इतकी प्रचंड गर्दी होती की, त्या महिलेला बाहेर पडणं अवघड झाले होते, जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू होती, तर दुसरीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता. यानंतर जे काही घडलं ते फारच चित्तथरारक होतं. या घटनेचा व्हिडीओ स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी

काल मुंबई आणि आसपासच्या भागात पाऊस पडला. मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल ट्रेन ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे ठाणे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत गेली. प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गर्दी इतकी प्रचंड वाढली की, लोकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर सोडा, आत गेल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठीही जागा नव्हती.

धक्का- बुक्कीत महिला प्रवासी अडकली ट्रेनखाली

लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशांना तासनतास लोकल ट्रेनची वाट पहावी लागली. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकावर गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. ठाणे रेल्वेस्थानकावर लोकल ट्रेन आल्यावर प्रवास करण्यासाठी एवढी गर्दी झाली की, प्रवासी एकमेकांना धक्का-बुक्की करत चढण्यासाठी प्रयत्न करत होते. याचवेळी लोकलमध्ये चढताना एका महिलेचा तोल गेला आणि ती चक्क ट्रेनखाली जाऊन अडकली. मात्र, तिथे उभ्या असलेल्या महिलांनी तिला कसेतरी बाहेर काढले, पण अतिशय थरारक अशी ही स्थिती होती.

ट्रेनखाली अडकलेल्या महिलाची जीव वाचण्यासाठी धडपड

ठाणे रेल्वेस्थानकावरील या घटनेच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांच्या डब्याजवळ प्रचंड गर्दी होती. यावेळी ट्रेनमध्ये शिरण्यासाठी अनेक महिला कसोशीने प्रयत्न करत होत्या, तर दुसरीकडे एक महिला ट्रेनखाली अडकल्याने अनेक महिला तिला बाहेर काढण्यासाठी मदत करत होत्या. ट्रेनखाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी ओरडत होती, मदतीसाठी किंचाळत होती. यावेळी अनेक महिलांनी पुढे येत तिला कसेबसे खेचून बाहेर काढले.

पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल

यावेळी अनेक महिला धक्काबुक्कीमुळे एकमेकांच्या अंगावर पडल्या. या घटनेमुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येकाची ट्रेन पकडण्यासाठी घाईगडबड सुरू होती. मात्र, ट्रेन आधीच प्रवाशांनी गच्च भरली होती की अनेकांना चढण्यासाठी जागाच मिळाली नाही. या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला ठाणे रेल्वेस्थानकावरील त्या भीषण स्थितीचा अंदाज येईल.

ठाणे रेल्वेस्थानकावर महिला प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai massive dust storm women trapped in tracks of mumbai local train at thane railway station other women saved her stampede like situation video goes viral sjr