Mumbai Metro Train and Bridge Viral: मुंबईत गुरुवारी संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता मात्र रात्री पुन्हा एकदा पावसाचे अनेक भागात थैमान पाहायला मिळाले. काल दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत शहरात (कुलाबा केंद्र) ८९.४ मिमी तर उपनगरांत (सांताक्रूझ केंद्र) ९०.८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या तुफान हजेरीनंतर मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मुसळधार पावसात मुंबई लोकलची सेवा उशिराने सुरु होती, काही ठिकाणी लोकल ट्रेन तासभर थांबून होत्या पण अशा स्थितीतही मुंबई मेट्रो सेवा मात्र अगदी दिमाखात व सुरळीत सुरु होती. या मुंबई मेट्रोचा असाच एक कौतुकास्पद व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पण यातील एक दृश्य पाहून मात्र मुंबईकरांचा संताप होत आहे.
तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, मुंबईतील तुफान पावसातही दहिसर लिंक रोड वरील मेट्रो ट्रेनचा स्मूथ प्रवास दाखवण्यात आला आहे. मात्र यात पुलाखाली मात्र लोकं गुडघाभर पाण्यातून चालताना दिसत आहेत. शिवाय ट्रॅफिकमुळे रस्ते सुद्धा ब्लॉक झाल्याचे दिसून येतेय. हे पाहून नेटकऱ्यांनी आधी कमेंट्समध्ये मेट्रोच्या कामकाजाचे कौतुक केले आहे पण रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांची दैना होत असल्याचे पाहवत नाही असेही म्हटले आहे.
Video : मुंबई मेट्रोचा प्रवास व्हायरल
दरम्यान, मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील कुलाबा परिसरात सर्वाधिक पाऊस झाल्याचे समजतेय. पाठोपाठ सीएसएमटी, नरिमन पॉईंट परिसरात जास्त पाऊस पडला होता ज्यामुळे चर्चगेट परिसर जलमय झाला होता. उद्यापर्यंत मुंबईतील पाऊस दोन दिवसांच्या तुलनेत शक्यता वर्तवण्यात आली आहे.