राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह बघायला मिळाला. मुंबई, ठाणे आणि पुण्यात तर प्रचंड जल्लोष होता. दहीहंडीच्या उत्साहाचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. यापैकी एक प्रकरण आता अनेकांचे लक्ष वेधून टाकेल असच आहे. या प्रकरणात एक मद्यधुंद व्यक्ती दहीहंडी फोडण्यासाठी चक्क ८० फूट उंचावर टॉवरवरून चढला आणि दहीहंडी फोडली. याहूनही हास्यास्पद म्हणजे ८० फूटाची दहीहंडी फोडल्यानंतर या व्यक्तीने दहीहंडीसाठी ठेवण्यात आलेलं ५५ हजार रूपयाचं बक्षिस तो मागू लागला. हे प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरमधल्या कॅम्प नंबर ५ इथल्या नेताजी चौकातील जय भवानी मित्र मंडळाची दहीहंडी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. शिवसेना बंडखोर नेते अरुण आशान यांनी ही दहीहंडी आयोजित केली होती. यासाठी तब्बल ५५ हजार ५५५ रूपयांचं बक्षिसही ठेवण्यात आलं होतं. ही दहीहंडी तब्बल ८० फूटावर बांधण्यात आली होती. ही दहीहंडी फोडण्यासाठी अगदी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि विठ्ठ्लवाडी इथले वेगवेगळे गोविंदा पथकं येत होती. पण ही दहीहंडी फोडण्यासाठी सगळे गोविंद पथकं अयशस्वी ठरत होते. शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत ही दहीहंडी फोडण्यासाठीचे गोविंदा पथकांचे प्रयत्न सुरू होते. कोण ही दहीहंडी फोडणार याची उत्सुकता लागलेली असतानाच एक मद्यधुंद व्यक्ती या दहीहंडीच्या दिशेने येताना दिसला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बॅटरी काढायला गेला अन् हातातच अगदी बॉम्बसारखा फुटला मोबाईल, घटना कॅमेऱ्यात कैद

भोला वाघमारे असं दारूड्या व्यक्तीचं नाव आहे. दहीहंडी बांधलेल्या टॉवरवर चढून मग दहीहंडीच्या दोरखंडाला लटकून तो हंडीच्या दिशेने आला. दहीहंडीच्या दोरखंडाला पडकडून तो जोरजोरात ओरडत होता आणि मोठ्याने बोलत होता. हे दृश्य धोकादायक होतं. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी आयोजकांनी ताबडतोब हंडी हळू हळू खाली घेतली. यात या नशेखोर तरूणाने डोक्याने दहीहंडी फोडली. भोला वाघमारे हा फूटपाथवर राहून बिगारीची कामे करतो. दोरी खाली करून घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. दहीहंडी फोडल्यानंतर हा व्यक्ती बक्षिस म्हणून ठेवलेल्या ५५ हजार ५५५ रूपयांची मागणी करू लागला. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे उल्हासनगरची ही दहीहंडी मात्र प्रचंड चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai news ulhasnagar drunk man climbs 7 floors tower to break dahi handi prp
Show comments