Mumbai Police Band Video: अकरा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे भक्ती केल्यानंतर आज (१७ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. राज्यभरात मिरवणुकीची धामधुम पाहायला मिळाली. दरम्यान मुंबई पोलिसांच्या ‘खाकी स्टुडिओ’ या बँडने बाप्पाला संगीतमय निरोप दिला आहे. मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब हँडलवर सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून अनेकांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. सहा मिनिटांच्या या व्हिडीओत मुंबई पोलिसांच्या बँडनी अतिशय श्रवणीय गाणं सादर केलं आहे. वर्दीतला माणूस आहे, म्हणून गर्दीतले सण साजरे करण्यात येत आहे, इथपासून ते मुंबई पोलिसांनी संपूर्ण गणेशोत्सवात मुंबईकरांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली.. इथपर्यंत वेगवेगळ्या कमेंट करून मुंबई पोलिसांचे आभार मानले जात आहेत. मुंबई पोलिसांच्या संगीतमय सादरीकरणाची झलक पाहुया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई पोलीस बँडने “एकदंताय वक्रतुण्डाय” या श्लोकावर आधारीत गाणं सादर केलं आहे. ट्रम्पेट, सनई आणि ड्रम हे वाद्य वापरून गाणं सादर करण्यात आलं. जे की ऐकायला अतिशय सुमधुर वाटतं. मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “खाकी स्टुडिओकडून बाप्पला निरोप देत आहोत. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पासाठी हे गाणं सादर करत आहोत.

इन्स्टासह युट्यूबवरही हे संपूर्ण गाणं अपलोड करण्यात आलं आहे.

हे वाचा >> Ganesh Festival 2024: “मिरवणुकीत गणवेशात नाचू नका, नाहीतर…”, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश जारी; कारवाईचा इशारा!

इन्स्टाग्रामवर अनेक युजर्सनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. एका युजरने कमेंट करताना म्हटले की, “माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, “बाप्पाला अतिशय सुंदर असा निरोप दिला आहे. मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवा दरम्यान आमच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आणि आता संगीतामधून बाप्पाला निरोप दिला. त्याबद्दल मुंबई पोलिसांचे मनापासून आभार.” तर अनेक युजर्सनी गणपती बाप्पा मोरया आणि विविध इमोजी टाकून मुंबई पोलिसांचा गौरव केला आहे.

पोलिसांना मिरवणुकीत नाचण्यास मनाई

दरम्यान गणेशोत्सवात डोळ्यात तेल घालून सुरक्षा पुरविणाऱ्या पोलिसांना यंदा पोलीस गणवेशात गणेश मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी नृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गणवेशावर नाचू नये, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्तांनी दिली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police band bids farewell to lord ganesha with mesmerising performance kvg