Mumbai Police Video : मुंबई पोलिस हे देशातील सर्वात मोठे पोलिस दल आहे. मुंबई पोलिस नवनवीन उपक्रम राबवित नागरिकांचा उत्साह वाढवत असतात. गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवात मुंबई पोलिस सेवा देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक शांतता व सुव्यवस्थेसाठी मुंबईत जागोजागी कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत आहे.
गणेशोत्सवात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या या मुंबई पोलिसांचा एक हटके व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिस गणपतीच्या गाण्यावर सूरमयी सादरीकरण करताना दिसताहेत.
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका मोठ्या मैदानात पोलिस पथक अनेक वाद्यांचा उपयोग करुन ‘देवा श्री गणेशा’ हे गीत सादर करताना दिसत आहेत. सर्व पोलिस वाद्य वाजवताना अतिशय तल्लीन झालेले दिसत आहेत.
गणेशोत्सव हा मुंबई पोलिसांचा खूप मोठा सण असतो. मुंबई पोलिस बँडच्या खाकी स्टुडिओकडून बाप्पाला देण्यात आलेली ही अनोखी मानवंदना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा : तीन हजार नारळांपासून साकारली बाप्पाची मूर्ती; १२ फूट उंच गणपतीच्या मूर्तीचा व्हिडीओ व्हायरल
mumbaipolice या अधिकृत अकाउंटवरून मुंबई पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “देवा श्री गणेशा!! गेले काही दिवस बाप्पाच्या सेवेत म्हणजेच बंदोबस्तात तल्लीन झालेल्या पोलिस मंडळींचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या मुंबई पोलिस बँडच्या खाकी स्टुडिओचे हे सूरमयी सादरीकरण. गणपतीबाप्पामोरया”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम… खूपच सुंदर… अंगावर काटा आला…” तर एका युजरने लिहिलेय, “मुंबई पोलिसांचे कौतुक करावे तितके कमी आहे.”