Mumbai Police Viral Video : मुंबई पोलीस नेहमी लोकांच्या मदतीसाठी धावून जातात, ऊन, वारा, पाऊस, रात्र, दिवस कशाचीही पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावतात. कोण कितीही मोठ्या संकटात सापडू दे मदतीसाठी ते नेहमी तत्पर असतात. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्याची जगभरात दखल घेतली जाते. मुंबई पोलिसांच्या याच धाडसी कार्याचा प्रत्यत मुंबईतील मरीन ड्राईव्ह फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील आला आहे. एक महिला मरीन डाईव्हच्या कट्ट्यावरुन पाय घसरुन समुद्रात पडली, यावेळी तिथे उपस्थित लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, जो एकून उपस्थित पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मागचा पुढचा विचार न करता पोलिसांनी थेट समुद्रात उडी मारली आणि महिलेचे प्राण वाचवले.
खळवलेल्या समुद्रातील लाटांमध्ये वाहून जाण्याची शक्यता अधिक असते, मात्र पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महिलेची मदत केली, यामुळे सोशल मीडियावर पोलिसांच्या धाडसाचे आता कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.
मरीन ड्राइव्ह समुद्र किनाऱ्याच्या भिंतीवरुन चालत असताना अचानक एक वृद्ध महिला पाय घसरुन पडली. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी महिलेचे प्राण वाचवण्यासाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. जो ऐकताच दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत या महिलेचे प्राण वाचवले. महिलेचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसांनी थेट खवळलेल्या अरबी समुद्रात उडी मारली. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जोडलेले कॉन्स्टेबल किरण ठाकरे आणि अनोल दहिफळे या दोघांनी जीवाची काळजी न करता समुद्रात उडी घेत महिलेचा जीव वाचवला.
हा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी महिलेला वाचवून सुरक्षित स्थळी नेताना दिसत आहेत. यासह महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी गाडीत बसवण्यापूर्वी इतर पोलिसही महिलेची काळजी घेताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मरीन ड्राइव्हच्या सुंदर महल जंक्शनजवळ ही घटना घडली. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस अधिकारी किरण ठाकरे आणि अनमोल दहिफळे यांनी समुद्रात उडी मारली आणि त्या महिलेचे प्राण वाचवले, ज्यानंतर महिलेला मरीन ड्राईव्ह 1 मोबाईल व्हॅनमधून पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून तिच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यावर कमेंट करत लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “मी भारतातील जवळपास सर्व प्रमुख मेट्रो शहरांमध्ये, मुंबईमध्ये प्रवास केला आहे/राहलो आहे. मुंबईत मला ६ वर्षे झाली, मुंबईसारखे शहर मी कुठेही पाहिले नाही,जिथे इतके सुरक्षित वाटते. मुंबई पोलीस हे देशासाठी खरे रत्न आहे”. दुसऱ्या युजरने लिहिले की, “आम्हाला आमच्या मुंबई पोलिसांबद्दल आदर आहे”. तिसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘लोक हे विसरतात की, पोलीस सुद्धा माणूस आहेत आणि त्यांचेही कुटुंब आहेत. अशा गोष्टींमुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. मुंबई पोलिसांना आशीर्वाद.