संपूर्ण देशासह मुंबई शहरही करोना विषाणूच्या विळख्यात आहे. शहराची कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यापासून लॉकडाउन काळात मुंबई पोलिसांवर मोठा ताण होता. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनाशी लढताना मृत्यूही झाला. परंतू खडतर काळातही मुंबई पोलीस कर्मचारी आपल्यातली माणुसकी आणि कर्तव्य नेहमी दाखवून देत असतात. वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ओंकार व्हनमारे या कर्मचाऱ्याने, चहा विकणाऱ्या एका मुलाला शिक्षणासाठी वह्या-पुस्तकं घेण्यासाठी मदत करत त्याला प्रोत्साहन दिलं आहे.
माटुंगा (दादर) परिसरात बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ओंकार यांना चहा विकणाऱ्या सागर माने या शाळकरी मुलाची ओळख झाली. मार्च महिन्यात वडील वारल्यानंतर सागर आपल्या वडीलांचं चहाचं कॅन्टीन चालवण्याचा प्रयत्न करतो. लॉकडाउन काळात सागर स्वतः चहा बनवून विकतो…पुढे काय करायचंय असं विचारलं असतान सागरने ओंकार यांना तुमच्यासारखं पोलीस व्हायचंय असं सांगितलं. यानंतर ओंकार यांनी सागरला १० वी ची पुस्तकं आणि वह्या घेऊन दिल्या. तसेच अभ्यासाकरता काही अडचण आल्यास मला संपर्क कर म्हणत ओंकार यांनी सागरला आपला फोन नंबरही दिला. ओंकार व्हनमाने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ओंकार व्हनमाने यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचं कौतुक केलं आहे.
परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते,जिद्द तेव्हाच जन्माला येते. @MumbaiPolice दलातील संवेदनशील पोलीस कर्मचारी ओंकार व्हनमारे यांनी काही दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरविलेल्या आणि घरी आजारी असणाऱ्या आईसाठी चहा विकणाऱ्या सागर माने या मुलाला दहावीची पुस्तके व वह्या घेऊन दिल्या. (१/२) pic.twitter.com/o3ucwdF51G
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 24, 2020
भविष्यात शिक्षण घेताना कोणतीही अडचण आल्यास मला संपर्क कर असा विश्वास व्हनमारे यांनी सागरला दिला. मला होतकरू, कष्टाळू व परिस्थितीची जाणीव असणाऱ्या सागरचे आणि त्याला मदत करणाऱ्या व्हनमारे यांचे खूप कौतुक वाटते. (२/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 24, 2020
जिद्द आणि स्वप्न या दोन्ही गोष्टी आपल्याला करोनापेक्षाही महत्वाच्या वाटतात. याच भावनेतून ओंकार व्हनमाने यांनी सागरला शिक्षणासाठी केलेली मदत ही नक्कीच कौतुकास्पद आहे.