Mumbai Rain Ghatkopar Shocking Video : मुंबईला बुधवारी परतीच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. इतकेच काय तर मुंबईची जीवनवाहिनी लोकल सेवाही पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे अनेक घरे व दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरले होते. यात मुंबईतील घाटकोपरमधील अनेक नागरिकांच्या घरातही अचानक पाणी शिरले, यात जीवितहानी झाली नसली तरी लोकांनी पै-पै जोडून उभ्या केलेल्या संसाराची भांडीकुंडी व चीजवस्तूंचे अतोनात नुकसान झाले. यात लोकांच्या घरातील फर्निचर, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंमध्ये पाणी शिरले. जीवापाड सांभाळलेल्या वस्तूंचे डोळ्यांदेखत होणारे नुकसान पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. घाटकोपरमधील मनाला चटका लावणाऱ्या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ घाटकोपरमधील नायडू कॉलनी या भागातील आहे. मुंबईत बुधवारी २५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले. अनेक नागरिकांच्या घरात मुसळधार पावसामुळे पाणी शिरले, ज्यामुळे नागरिकांची सर्व सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावपळ सुरू झाली. घरातील फ्रिज, कपाटातील कपडे, कपाट, कागदपत्र, भांडी पावसाच्या पाण्यामुळे भिजून पूर्णपणे खराब झाली; त्यामुळे लोकांनी घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका चाळीत अनेक घरांत मुसळधार पावसाचे पाणी शिरलेय, काही घरांमध्ये तर गुडघाभर पाणी साचल्याचे दिसते आहे. या पाण्यात लोकांच्या घरातील बेड, कपडे धुण्याची मशीन, कपड्याचे लोखंडी कपाट, गाद्या आणि इतर वस्तू अक्षरश: बुडालेल्या दिसत आहेत. लोकांची घरात शिरलेले पाणी बाहेर काढत आपला संसार वाचवण्यासाठी धडपड चाललेली आहे. घरातील कपडे, चादरी, धान्य सर्व काही भिजले. अशावेळी ज्या वस्तू भिजण्यापासून वाचवता येऊ शकतात, अशा वस्तू पटापट सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवल्या जात होत्या. काहींनी पाण्याने भिजलेल्या अनेक वस्तू घराबाहेर आणून ठेवल्या. संपूर्ण चाळभर नाल्याचे घाण पाणी साचले होते. पण, लोकांना पर्याय नसल्याने त्याच पाण्यातून वाट काढत ते आपल्या घरातील वस्तू वाचवण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे मुंबईत झालेल्या पावसाने घाटकोपरमधील या लोकांचे हाल पाहून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – मुंबईकरांनो, गाडी चालवताना सावधान! पावसामुळे रस्त्यांवर फिरतोय भलामोठा अजगर; Video मध्ये पाहा गोरेगावमधील भीतीदायक दृश्य

तर काहींनी पावसातील घाटकोपरमधील ही परिस्थिती त्यांच्या भागातही पाहायला मिळत असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हे दृश्य पाहून लोकांना काळजी घेण्याचेदेखील आवाहन केले. दरम्यान, या नागरिकांना प्रशासनानेही काहीतरी मदत केली पाहिजे, असे मत काहींनी व्यक्त केलेय.