Mumbai Hindmata Rain Video: राज्यभरात सध्या परतीच्या पावासाचा कहर पाहायला मिळत आहे. काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे २६ जुलैसारखी परिस्थिती ओढावतेय की काय, अशी भीती मुंबईकरांना वाटत होती. कारण संध्याकाळी मुंबईतील सर्वच भागांत पावसाने कमालीचा जोर धरला होता. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वे सेवाही विस्कळीत झाली, मुंबईतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. लालबाग, परळ, दादर या भागांतही रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झालं होतं, त्यामुळे परतीच्या पावसाने मुंबईची जणू तुंबई झाली असे म्हणायला काही हरकत नाही. कारण दादरचा हिंदमाता परिसरही पावसाच्या पाण्याने अक्षरश: भरला होता. मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसरातील रस्त्यामधून वाहनांना वाट काढणे अवघड झाले होते, याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसराची झालेली ही स्थिती पाहून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

दादरचा हिंदमाता परिसर पाण्यात कोसळला मुसळधार पाऊस (Mumbai Rain Viral Video)

मुंबईत बुधवारी संध्याकाळपासूनच मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे, ज्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी शिरले, रेल्वे रुळ पाण्याखाली गेले, ज्यामुळे मुंबईतील रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक रेल्वेस्थानकांवर लोकांची घरी जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी रस्त्यावरील मॅन होलमध्ये पडून मृत्यू झाल्याच्यादेखील घटना घडल्या. यात दादरच्या हिंदमाता परिसरालाही मुसळधार पावासाचा फटका बसला. इथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनं बंद पडली होती, त्यामुळे चालकांना धक्का मारत ही वाहने घेऊन जावी लागली. गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जाणे नागरिकांनाही अडचणीचे जात होते, पण तरीही नागरिक लवकर आणि सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी जीव मुठीत घेऊन या पाण्यातून जात होते. इथे सखल भाग असल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

हेही वाचा – भरवर्गात माकडाची एन्ट्री! विद्यार्थीनीला मारली मिठी, केस पकडले अन्…; पाहा खट्याळ VIDEO

“वेलकम हिंदमाता वॉटर पार्क

दादर हिंदमाता परिसरातील मुसळधार पावसातील परिस्थितीचा एक व्हिडीओ @dadarmumbaikar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये परतीचा पाऊस नाही तर बेक्कार लेव्हल पाऊस असे लिहिले आहे. तर व्हिडीओवर वेलकम हिंदमाता वॉटर पार्क असे लिहिण्यात आले आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवरून आता नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. तसेच मुंबई महानगरपालिका आणि सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये मिश्कीलपणे लिहिलेय की, “व्वाव, काय सुंदर स्विमिंग पूल आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलेय की, “पृथ्वीवरील सर्वात खोल भाग म्हणजे दादर हिंदमाता”, तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, एखादा ऑस्कर पुरस्कार उरला असेल तर बीएमसी आणि सरकारला द्यावा. त्यांनी किती लाखमोलाची कामगिरी बजावली आहे, नको त्या भंपक योजना काढत सुटतात आणि महत्त्वाचे मुद्दे राहिले बाजूला. चौथ्या युजरने लिहिले की, परतीचा नाही भरतीचा पाऊस… अशाप्रकारे युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स करत बीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.