Mumbai Rains Python Video: मुंबईत सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे खूप हाल झाले, रस्त्यांवर जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले; ज्यामुळे अनेक मुंबईकरांना घरी पोहोचायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच अनेकांच्या घरांत अचानक पाणी शिरल्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अशा परिस्थितीमुळे मुंबईकरांची अवस्था फार बिकट झाली होती. पण, मुंबईकरांबरोबर मुंबईभोवतीच्या जंगलातील प्राण्यांनाही मुसळधार पावसाचा फटका सहन करावा. कारण- मुसळधार पावसानंतर अनेक वस्त्यांत पाणी शिरल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. अशात मुंबईतील गोरेगारवमधील आरे जंगलातून एक भलामोठा अजगर रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाला.
अचानक वाहनासमोर भलामोठा अजगर पाहून घाबरले लोक
काळोखी रस्ता, मुसळधार पाऊस आणि त्यात अचानक समोर आलेला भलामोठा अजगर पाहून लोकही घाबरले. यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही भीती वाटेल. त्यामुळे मुंबईकरांनो, पावसात आरे परिसरातून प्रवास करणार असाल, तर थोडी सावधगिरी बाळगा.
मुंबईतील गोरेगाव आरे कॉलनीतील हा व्हिडीओ @ranjeetnature नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हा महाकाय अजगर रस्त्यावर दिसल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी मुंबईत सर्वत्रच मुसळधार पाऊस सुरू होता. मुंबईतील आरे परिसरातही पावसामुळे अनेक वाहनचालक सावकाश धीम्या गतीने वाहन चालवीत होते. याच वेळी अचानक काही वाहनचालकांना एका काळोख्या रस्त्यावर जवळपास सहा फुटांचा अजगर रस्ता ओलांडताना दिसला. अजगराला पाहताच अनेकांनी गाड्या थांबवल्या. जेणेकरून अजगराला कोणतीही दुखापत होऊ नये, तसेच काही विचित्र घटना घडू नये, यावेळी तिथे थांबलेल्या लोकांनी अजगर रस्ता ओलांडून झुडपात जाईपर्यंतचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले; ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read More Latest Mumbai Rain News : “वेलकम हिंदमाता वॉटर पार्क”, मुसळधार पावसानंतर दादरमधील ‘तो’ VIDEO पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “बीएमसीला ऑस्कर…”
अजगराचा व्हिडीओ पाहून युजर्स का म्हणाले? वाचा
२६ सप्टेंबरचा हा व्हिडीओ आता खूप व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचे कौतुक केले आहे. कारण- लोकांनी गाड्या थांबवून अजगराला कोणतीही दुखापत होऊ न देता त्याला जंगलात जाऊ दिले. तर, काहींनी या परिस्थितीला माणूसच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. कारण- आरे परिसरात काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आणि त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारे अनेक जंगली प्राणी मानवी वस्तीत दिसत असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
पण, अशाच प्रकारे मानवी वस्तीत जंगली प्राणी दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. गोरेगाव परिसरात अलीकडील दोन दिवसांत एका इमारतीत चक्क घोरपडीचा वावरही दिसून आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.