Viral Video : बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्या मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात. एक दिवस जरी ही बस बंद असेल तरी नागरिकांचे वेळापत्रक चुकते. मुंबईकरांना किफायतशीर वाहतूक सेवा पुरविणाऱ्या बेस्टच्या गाड्या मुंबईतील लोकांसाठी जीव की प्राण आहे. दर दिवशी हजारो लोकं बेस्टच्या बस गाड्यांनी प्रवास करतात.बेस्टचे गुणगाण गाणारे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल पण सध्या एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बसच्या फ्लोअरला(Floor) भले मोठे छिद्र पडलेले दिसून येत आहे. बेस्टच्या गाड्याची दयनीय अवस्था पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सख्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ बेस्टच्या चालत्या बसमधील आहे. एका प्रवासीने हा व्हिडीओ शूट केला आहे. बसमध्ये प्रवासी बसलेले दिसत आहे आणि कंडक्टर प्रवाशांचे तिकीट काढताना दिसत आहे. पुढे व्हिडीओमध्ये बसच्या फ्लोअरला(Floor) पडलेले भले मोठे छिद्र दिसत आहे. व्हिडीओत बस गाडीचा नंबर सुद्धा दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसू शकतो.
Bandra Buzz या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये mybestbus या बेस्ट अकाउंटला टॅग करुन लिहिलेय, “आज वांद्रे स्टेशनला बेस्टच्या बसमध्ये चढत असताना हे धोकादायक छिद्र दिसले. याबाबत कंडक्टरला कळवले तेव्हा तो हसला आणि निघून गेला. विशेष म्हणजे या मार्गावर बहूतेक प्रवासी हे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा.”
या व्हिडीओवर बेस्ट बस वाहतूक सेवा मुंबईचे अधिकृत अकाउंट myBESTBus वरुन या व्हिडीओवर प्रतिक्रिया सुद्धा आली. त्यांनी लिहिलेय, “वांद्रे डेपोच्या मेंटेनन्सला याबाबत सूचना दिली आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “अशा बसेस रस्त्यावर चालवण्याबाबत मेंटेनन्स विभागाला दंड ठोठावला पाहिजे.” आणखी एका युजरने रोष व्यक्त करत लिहिलेय, “बेस्ट ही एक अयशस्वी संस्था आहे.”