Mumbai Shivaji Park Viral video : दादरमधील शिवाजी पार्क हे मुंबईकर तरुणांचे खेळण्यासाठीचे हक्काचं मैदान आहे. रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसांत या मैदानात क्रिकेटसह इतर अनेक प्रकारचे खेळ खेळणाऱ्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि काँक्रिटीकरणामुळे शहरातील मोकळ्या जागा, मैदानं कमी होत असल्याने अनेक तरुण खेळण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात गर्दी करतात. देशाचा महान क्रिकेट सचिन तेंडुलकरने देखील याच मैदानातून आपल्या क्रिकेट करियरला सुरुवात केली. अनेकांचे करिअर घडवणाऱ्या या शिवाजी पार्काला आता मात्र परप्रांतीय फेरीवाल्यांनी घेराव घातला आहे. पार्कातील खेळाच्या मैदानात अनेक फेरीवाले मुजोरी करत धंदा करताना दिसताय. यात परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुजोरपणाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात काही फेरीवाले शिवाजी पार्क मैदानात खेळणाऱ्या तरुणांना चक्क माराहाण करताना दिसतायत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संबंधीत फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
फेरीवाल्यांची मैदानात खेळणाऱ्या मुलांवर दादागिरी
मुंबईकरांचे हक्काचे मैदान असलेल्या या शिवाजी पार्कात अशाप्रकारची घटना घडणे ही खरंच एक संतापजनक गोष्ट असल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. शिवाजी पार्क मैदान परिसरात सध्या मोठ्याप्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा वावर दिसून येतो. वारंवार तक्रार करुनही त्यांच्यावर कोणताही ठोस कारवाई होत नाही. अशात या घटनेतून फेरीवाले मैदानात खेळणाऱ्या मुलांवरही दादागिरी करतात हे स्पष्ट होतेय.
फेरीवाल्यांचा असा मुजोरपणा कितपत योग्य?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मैदानात खेळणारे तरुण आणि फेरीवाल्यामध्ये हाणामारी झाली. यावेळी काही तरुणांनी मधे पडून त्यांचे भांडण रोखले. फेरीवाले मैदानाच्या आवारात फुटबॉल खेळणाऱ्या तरुणांना रोखत होते. ज्यावरुन हे भांडण सुरु झाल्याचे सांगितले जाते. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा खेळाच्या मैदानात फेरीवाल्यांचा असा मुजोरपणा कितपत योग्य आहे, तसेच या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे?
मुजोर फेरवाल्यांनी मुलांना केली मारहाण
शिवाजी पार्कातील धक्कादायक व्हिजीओ dadarmumbaikar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, काही मुलं शिवाजी पार्क मैदानातील C3 भागात फुटबॉल खेळत होती. यावेळी तिथे अनधिकृतपणे पाणीपुरीचा स्टॉल बसलेल्या फेरीवल्यांनी मुलांना खेळण्यास मनाई केली. यावरुन फेरीवाला आणि मुलांमध्ये बाचाबाची झाली, थोड्यावेळाने या बाचाबाचीचे रुपांतर शेवटी हाणीमारीपर्यंत जाऊन पोहोचले. यावेळी मुजोर फेरीवाल्यांनी मुलांना मारहाण केली. दरम्यान हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. कमेंटमध्ये अनेकांनी मारहाण करण्यात आलेली मुलं मराठी होती असा दावा केला आहे.
काहींनी याप्रकरणी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. काही युजर्सने म्हटले की, “आज एक दिसतोय हे थांबले नाही तर पुढच्या काही महिन्यात खाऊ गल्ली होईल”. बहुतेक युजर्स म्हणतायत की, “मुंबई महानगरपालिका आणि पोलीस या फेरीवाल्याकडून हफ्ते घेतात, त्यामुळे त्यांना अशाप्रकारे विरोध करण्याची ताकद मिळते”. तर काहींनी “या परिस्थितीसाठी मराठी माणसाला जबाबदार धरले आहे”.