मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचे १२ जुलै २०२४ रोजी लग्न होणार आहे. लग्नासंबंधी विविध विधी व कार्यक्रम सुरू झाले असून, त्यासाठी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. संपूर्ण अंबानी कुटुंब आणि बॉलीवूडमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. एकीकडे लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटींची गर्दी होत आहे; तर दुसरीकडे हॉलीवूड सेलिब्रिटीही यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. या विवाह समारंभास जगभरातून व्हीव्हीआयपी येणार आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी १२ ते १५ जुलैपर्यंत मुंबईतील वाहतुकीत बदल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे लग्न इतके उच्च प्रतिष्ठित झाले आहे की, मुंबई पोलिसांना विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी लोकांसाठी ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली असून, ती पाहून लोक संतप्त झाले आहेत. ट्रॅफिक ॲडव्हायजरीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासामुळे ते संतापले आहेत आणि ते आपला राग सोशल मीडियावर आपल्या पद्धतीने काढत आहेत.

जिओ सेंटर रोड टाळण्याचा सल्ला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासंदर्भात मुंबईकरांसाठी ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली आहे. ॲडव्हायजरीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या आजूबाजूला रस्ते ब्लॉक करण्याच्या दृष्टीने मार्ग वळविण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

१२ जुलै ते १५ जुलैदरम्यान हा विवाह सोहळा चालणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात असे म्हटले आहे की, १२ ते १५ जुलै या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, वांद्रे (पू) मुंबई येथे अनेक भव्य कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणे टाळावे.

(हे ही वाचा: Photo: आधारकार्डसाठी चिमुकलीनं दिल्या अशा पोझ की, फोटो पाहताच कन्फ्युज व्हाल, येईल ‘या’ मुलीची आठवण)

युजर्सकडून संताप व्यक्त

या लग्नासाठी केली जाणारी विशेष वाहतूक व्यवस्था आणि त्यामुळे दिला गेलेला हा वाहतुकीबाबतचा सल्ला मुंबईकरांना पसंत पडलेला नाही. त्याबाबत लोकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एक्स हॅण्डलवरील एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “उद्योगपतीचा खासगी कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम कधी झाला? मुंबईतील प्रत्येक नागरिकाला आमंत्रित केले आहे की, काही निवडक लोकांना? सर्वसामान्यांची गैरसोय होण्याऐवजी दिवसा, कदाचित रात्रीचे वेळापत्रक बदलण्यास आयोजकांना सांगायला हवे होते.”

आणखी एका युजरने म्हटले, “अनंत अंबानींच्या लग्नासाठी एवढी काळजी, पण सामान्य जनतेच्या घरी होणाऱ्या लग्नाची कुणाला काळजी आहे का?” एका युजरने विचारले की, “सरकारने खासगी कार्यक्रमांमध्ये हस्तक्षेप करणं कधीपासून सुरू केला? मग एवढीच काळजी आहे तर, सरकारने मुंबईत सुट्टी जाहीर करावी”, अशा प्रकारचा संताप नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai traffic advisory for anant ambani radhika merchant wedding sparks public outcry declare a holiday pdb
Show comments