Auto Rickshaw Faulty Meter Mumbai Police Video : मुंबईकरांनो, तुम्हीदेखील ऑटो रिक्षाने प्रवास करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ऑटो रिक्षाने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना चालकांचा मुजोरीचा सामना करावा लागतो. काहीवेळा मीटर वाढवण्यासाठी चुकीच्या किंवा लांबच्या रस्त्याने घेऊन जाणे, कमी अंतरासाठी अवाच्या सव्वा भाडे आकरणे, विनाकारण वाद घालणे; अशा अनेक गोष्टींचा सामना प्रवासी करत असतात. रिक्षाने प्रवास करताना काहीवेळा असाही अनुभव येतो की, कापलेल्या अंतरापेक्षा मीटर अधिक वेगाने पळतेय. यावेळी आपली फसवणूक होतेय हे ग्राहकांच्या लक्षात आलेलं असतं, पण ते सिद्ध कसं करायचं हे समजत नाही. अशावेळी तुम्ही रिक्षाचालकाच्या फसवणुकीचे बळी ठरता. मात्र, आता मुंबई वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्याकरता एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात मुंबई पोलिसांनी रिक्षामधील सदोष मीटर कसे ओळखायचे याची सविस्तर माहिती दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी व्हिडीओमध्ये नेमकं काय सांगितलं आहे जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई वाहतूक पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

मुंबई वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालक मीटरमध्ये छेडछाड करत कशाप्रकारे प्रवाशांची फसवणूक करतात हे व्हिडीओसह दाखवले आहे. या व्हिडीओमधील रिक्षातील मीटरला घोडा मीटर असे म्हटले जाते. म्हणजेच काय, तर घोडा ज्या वेगाने पळतो त्या वेगाने पळणारे मीटर. व्हिडीओत पाहू शकता की, एका जागी उभ्या असलेल्या रिक्षातील मीटर कशाप्रकारे वेगाने पळत आहे. म्हणजे त्यातील भाड्याची रक्कम सेकंद सेकंदाने वाढत जातेय. या मीटरचा वेग वाढवण्यासाठी रिक्षाच्या हँडलमागे एक बटण आहे. हे बटण रिक्षाचालकाने सुरू करताच मीटर वेगाने पळतेय, तर बंद केल्यास मीटर सामान्य वेगात चालते. मात्र, हे मीटर सुरू आहे की बंद हे ग्राहकांनी कसे ओळखायचे, तर तेही पुढे सांगितले आहे.

रिक्षाचं भाडं वेगानं वाढतंय हे ओळखणार कसं?

रिक्षाचे मीटर वेगाने पळवले जातेय हे ओळखण्यासाठी मीटरवरचं एक छोटा पॉइंट ब्लिंक होताना दिसतो. चालकाने मीटर वेगाने पळवण्याचं बटण सुरू करताच मीटरवरील शेवटच्या आकड्यानंतर एक छोटा पॉइंट ब्लिंक होताना दिसतो. म्हणजे मीटरवर जर १००.०० रुपये इतकं भाडं दिसत असेल आणि वेगाने मीटर पळवण्याचं बटण सुरू केलं तर मीटरवर दिसणाऱ्या रकमेच्या म्हणजे १००.०० या रकमेच्या शेवटी एक . दिसेल. म्हणजेच ही रक्कम मीटवर १००.००. अशी दिसेल. यावरून तुम्ही ओळखायचे की चालकाने मीटर वेगाने पळवण्याचे बटण सुरू केले आहे. अशाप्रकारे जर तुमचीही फसवणूक झाली तर तुम्ही संबंधित रिक्षाचालकाची तक्रार त्याच्या रिक्षाच्या क्रमांकासहित जवळच्या आरटीओ कार्यालयामध्ये करू शकता.

“जाणकार बना!”, मुंबई वाहतूक पोलिसांचे आवाहन

मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलेय की, रिक्षाचे भाडे अचानक कसे वाढे? जाणून घ्या एका तीळाएवढा फरक, कशाप्रकारे रिक्षाचालक तुमची फसवणूक करतो! तुमच्या नकळतपणे मीटरमध्ये फेरफार करून आहे त्यापेक्षा जास्त शुल्क आकारले जाते. हे टाळण्यासाठी जाणकार बना! अशाप्रकारे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना रिक्षाचालकांच्या फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”

दुसऱ्या एका पोस्टमध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की, मीटरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर कारवाईमध्ये एफआयआर, परमिट रद्द करणे आणि वाहन जप्त करणे यांचा समावेश आहे. दरम्यान, अनेकांनी ही फसवणूक टाळण्यासाठी रिक्षामधील मीटर काढून त्याजागी ओला, उबरसारखे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे फसवणूक टाळता येऊ शकते असे त्यांचे मत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai traffic police release video guide to help commuters identify tampered auto rickshaw meters how mumbaikar can check rickshaw meter for overcharge sjr