Lalbaugcha raja 2024 : नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागचा राजाला पाहायला भाविकांची प्रचंड गर्दी आपण पाहिली. मुख दर्शनाची रांग असो किंवा चरण स्पर्श, भाविक तासनतास रांगेत उभे असतात. अशावेळी ११ दिवस सुरू असलेली भाविकांची गर्दी अखेर बाप्पाला निरोप देण्याच्या काही तास अगोदर विसर्जनाच्या तयारीसाठी म्हणून दर्शनाच्या रांगा बंद करतात. चरण स्पर्श रांग सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता बंद झाली आणि मुख दर्शन रांग मध्यरात्री १२ वाजता बंद झाली. यावेळी लालबागचा राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरवी लाखोंच्या गर्दीत मानानं वावरणारे कार्यकर्तेही या तरुणासोबत अचानक फोटो घेताना दिसले.
नक्की काय घडलं?
लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेला तरुण तासाभरापूर्वी रांगेत चेंगरा-चेंगरीमध्ये उभा होता, मात्र काही वेळातच तो व्हीआयपी झाला. त्याचं झालं असं की, यंदा लालबागचा राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी येवला, नाशिक येथून आलेला विशाल आळणे हा मुख दर्शन रांगेतील शेवटचा व्यक्ती ठरला आहे. लालबागचा राजाचं दर्शन बंद करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याआधी शेवटचा भक्त म्हणून विशाल आळणे याला स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी परवानगी दिली. यावेळी लालबागचा राजाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या शेवटच्या समूहामधील तो शेवटचा व्यक्ती दर्शन रांगेमध्ये प्रवेश करू शकला, म्हणून त्याला “सर्वात भाग्यवान व्यक्ती” म्हटले गेले.
मुंबईतील लालबाग हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात, दोन-दोन दिवस रांगेत उभे राहतात. अशातच एवढ्या लाखोंच्या गर्दीत लालबागच्या राजाचं रांगेतून दर्शन घेणारा हा शेवटचा व्यक्ती ठरला, त्यामुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे एरवी लाखोंच्या गर्दीत मानानं वावरणारे कार्यकर्तेही या तरुणासोबत फोटो घेताना दिसले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गेटमधून विशाल हा शेवटचा व्यक्ती आतमध्ये आला आहे. यावेळी मंडळातील सर्व कार्यकर्ते त्याच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
विशालने याचा व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत लिहिले, “ही शान कोणाची, लालबागच्या राजाची..; मी खूप नशीबवान आहे.” नेटकऱ्यांनीही व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आणि त्याला “लालबागचा राजा मुख दर्शन २०२४ साठी सर्वात भाग्यवान आणि शेवटची व्यक्ती” असे संबोधले. “तो खूप नशीबवान आहे, बाप्पाला खरोखर त्याला पाहायचे आहे,” तर आणखी एकानं कमेंट करत “वेळ बदलायला वेळ लागत नाही, भाऊला VVVIP सारखे वागवले गेले,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.