Mumbai Viral Video : तुम्हाला एखादी कला आवडत असेल, तर ती मनापासून शिकण्यासाठी, जोपासण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण देव काही व्यक्तींकडून एखादी गोष्ट हिसकावून घेतो; पण त्याच वेळी अशा लोकांना अशी काही कलेची देणगी देतो, जी पाहून कोणीही हरवून जाईल. सध्या सोशल मीडियावर एका अपंग तरुणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचतोय. धडधाकट माणूसही याच्यासमोर फिका पडेल असा या तरुणाचा डान्स आहे. या अपंग तरुणाने आपल्या डान्सच्या माध्यमातून इतरांना आनंदाने जगण्याचा नवा मार्ग शिकवला आहे.
एका पायाने अपंग असूनही या तरुणाने ‘सैराट’ या चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मुंबईतील परेलमधील टाटा मेमोरियल रुग्णालयात अपंग लोकांसाठी आयोजित एका कार्यक्रमात हा तरुण नाचतोय. विशेष म्हणजे हा तरुण चक्क एका पायावर नाचत आहे, जो पाहून कोणीही थक्क होईल. या तरुणाच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपंग तरुणाचा भन्नाट डान्स
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक अपंग तरुण आनंदी चेहऱ्याने स्टेजवर येतो, एका पायाने अपंग असलेला हा तरुण उपस्थित प्रेक्षकांकडे पाहून हातातील कुबडी खाली ठेवतो आणि झिंगाट गाण्यावर बेभान होऊन नाचतो. हा तरुण अगदी मनापासून डान्स करतोय, त्याचा हा डान्स अक्षरश: थक्क करणारा होता. यावेळी उपस्थित प्रेक्षकही टाळ्या वाजवून, नाचत त्याला प्रोत्साहन देताना दिसले.
Read More Trending News : रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांकडून फळं, भाज्या खरेदी करताय? मग फसवणुकीचा ‘हा’ Video पाहा, तुम्हालाही बसेल धक्का
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला जाणवते की, कित्येक जण सर्व काही असूनही आयुष्यभर फक्त माझ्याकडे हे नाही, ते नाही असे म्हणत रडत बसतात; पण हा तरुण देवाने जे दिलंय, त्यात समाधान मानत आपलं आयुष्य आनंदानं जगतोय. त्याचा हा आनंद त्याच्या डान्स आणि चेहऱ्यावरील हास्यामधूनही दिसून येतोय.
अपंग असूनही तो खचून न जाता, त्याला आवडणाऱ्या गोष्टी अगदी मनापासून करतोय. हा व्हिडीओ शरीराने धडधाकट असणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचा हा व्हिडीओदेखील काळजाला भिडणारा आहे. एका युजरने लिहिलेय की, भावा, तू जिवंतपणाचे अप्रतिम उदाहरण आहेस. दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, काय हिंमत दाखवली आहेस भावा; तर काहींनी त्याला ‘फूल ऑफ एनर्जी’, असे म्हटले आहे.