Mumbai Real Estate Latest News Update : मुंबई स्वप्नांची नगरी…पण या मुंबईत राहण्यासाठी जागा मिळाली म्हणजे खऱ्या अर्थाने एखाद्याचं स्वप्नांची पूर्तताच झाल्यासारखी असते. त्यातच मुंबईच्या जागेचे भाव गगनाला भिडलेले. त्यामुळे ज्यांची आर्थिक बाजू भक्कम आहे, अशा लोकांनाच मुंबईत घर खरेदी करणं परवडत असेल. पण आता तर मुंबईत घर खरेदी करण्याचं चित्रच बदललं आहे. जाती-धर्म पाहून मुंबईत घरांची विक्री होत आहे का? असा प्रश्न एका व्हायरल झालेल्या ट्वीटमुळे उपस्थित झाला आहे. मुंबईत घर घेण्यासाठी या मुस्लीम तरुणीला किती संघर्ष करावा लागला, हे तिचा मित्र बलराम विश्वकर्मा यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.
विश्वकर्मा यांनी ट्वीट करत म्हटलंय की, गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या ओळखीच्या एका २० वर्षांच्या मुस्लीम तरुणीला मुंबईत घर शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. द केरला स्टोरी चित्रपटामुळे यावर्षी मुस्लीम समाज वाढला आहे. या कारणामुळे अनेक ठिकाणी तिला घर देण्यास नकार देण्यात आला. तुम्हाला रात्री झोप कशी येते? असं ट्वीट विश्वकर्मा यांनी केलं असून @sudiptoSENtlm @VipulAlShah यांना टॅगही केलं आहे.
या प्रकरणावर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
हे ट्वीट व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, द केरला स्टोरी चित्रपटाल सपोर्ट करत नाही. पण तुमच्या ओळखीची तरुणी यारी रोडच्या मिलत नगरसारख्या मुस्लीम भागात घर शोधू शकते. मुस्लीम लोक राहणाऱ्या विभागात तिला घर देण्यास मनाई करत आहेत का? असं तुम्हाला म्हणायचं आहे? की, तिला मुस्लीम लोकांच्या शेजारी राहायचं नाही?, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिलीय.
सामन्य माणसांसोबतच नाही, तर सेलिब्रिटी लोकांनाही मुंबईत भाड्याचे घर शोधण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. जानेवारी २०२३ मध्ये मॉडेल उर्फी जावेदनेही मुंबईत घर शोधताना संघर्ष करावा लागत असल्याचं ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्याआधी अभिनेता इमरान हाशमीनेही ट्वीट करत म्हटलं होतं की, धर्मामुळे सोसायटीच्या सदस्यांनी मला नवीन घर शोधत असताना नाहक त्रास दिला होता. तसेच टीव्ही अभिनेत्री शिरिन मिर्झा, अॅली गोनी यांनाही त्यांच्या धर्मामुळे घर देण्यास मनाई करण्यात आल्याचं ट्वीटच्या माध्यमातून समोर आलं होतं.