गुजरातच्या अहमदाबादमध्ये मुस्लिम समाजाने राम मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मदत केली आहे. तौक्ते या चक्रीवादळात हे मंदिर उद्ध्वस्त झालं होतं. या वादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. अमरेली जिल्ह्यातील झार गावात हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी मुस्लीम समाजाने पुढाकार घेतला आहे. २०२१ मध्ये तौक्ते वादळ आलं होतं. या वादळाचा मोठा फटका बसला होता.
झार या गावात जे प्रभू रामाचं मंदिर बांधण्यात आलं त्या मंदिरासाठी जमीन दान केली ती एका मु्स्लीम माणसाने. बुधवारी राम कथाकार मुरारी बापू यांच्यासह धर्मगुरुंच्या उपस्थितीत हे पुनर्बांधणी करण्यात आलेलं मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. झार या गावात हिंदू आणि मुस्लीम बांधव सलोख्याने राहतात. दाऊदभाई लालील्या यांच्या कुटुंबाने हीच परंपरा पुढे सुरु ठेवली आहे. दाऊदभाई लालील्या यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी फक्त मदत केलेली नाही. तर लाखो रुपयेही खर्च केले आहेत. तसंच त्यांच्या भाच्यानेही या मंदिरासाठी जमीन दिली आहे. मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या या पुढाकाराचं कौतुक होतं आहे.
झार हे गाव १२०० लोकवस्तीचं आहे
प्रभू रामाच्या मंदिराची पुनर्बांधणी झाल्यानंतर आणि मंदिर सगळ्या भाविकांसाठी खुलं करण्यात आल्यानंतर दाऊदभाई लालील्या यांनी संपूर्ण झार गावासाठी भंडाराही आयोजित केला होता. १२०० लोकवस्ती असलेलं हे गाव आहे. या गावात १०० मुस्लीम राहतात. या मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक धर्मगुरु आले होते. टाइम्स ऑफ इंडियाने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
या मंदिराच्या उद्घाटनानंतर संतसभा आयोजित करण्यात आली होती. आमच्या गावामध्ये हिंदू आणि मुस्लीम सगळे गुण्यागोविंदाने राहतो. आम्ही एकमेकांना हिंदू किंवा मुस्लीम असं मानत नाही. एकमेकांमध्ये सलोख्याचं वातावरण रहावं आणि आणि बंधुभावाचं असावं यासाठी आम्ही कायमच प्रयत्न करतो असं दाऊदभाई लालील्या यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या कन्या मुमताझ पटेल या देखील या गावात आल्या होत्या.