प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक वेळ असते ती वेळ गेली की तुम्ही लाख प्रयत्न केले तरी हाती निराशाच लागते हे आपण नेहमीच ऐकत आलो . आज आपल्या घरात आजूबाजूला शेजारी पाजारी तुम्हाला लाखो महिला भेटतील ज्या आपल्या दैंनदिन गरजा भागवण्यासाठी कोणावर तरी अवलंबून आहेत. कमी वयात लग्न झालं, फार लवकर संसाराची जबाबदारी आली किंवा आर्थिक कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं अशा एक ना अनेक कारणामुळे त्यांची प्रगती खुंटत गेली. आता काही भूतकाळात जाऊन करिअरची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवणं शक्य नाही, अशी भावना अनेकींच्या मनात येत असेल. पण अशांनी या महिलेची गोष्ट वाचलीच पाहिजे.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर एका महिलेची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या महिलेचे नाव मात्र समजू शकलं नाही. तरी गृहीणी ते शिक्षिका असा तिचा प्रवास मात्र प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. जिथे मुलींचा जन्म एखाद्या दु:खद घटनेसमान मानला जातो अशा कुटुंबात तिचा जन्म झाला. वयाच्या १७ व्या वर्षी तिचं लग्न झालं. पण सासरी आल्यावर मात्र तिचं आयुष्य काहीप्रमाणात बदललं. सासरची मंडळी मुक्त विचारांची होती. मुलीने शिकावं, प्रगती करावी असं त्याचं म्हणणं होतं, म्हणूनच सासरच्या मंडळींनी तिला महाविद्यालयात पाठवले पण बारावी पूर्ण होण्याआधीच गर्भवती राहिल्याने तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पुढे मुलं- बाळं संसार यातून स्वत:चं करिअर घडवण्यासाठी तिला कधी वेळच मिळाला नाही. करिअर घडवण्याची वेळही निघून गेल्याची खंत तिला राहून राहून वाटतं होती. तिची मुलगी जेव्हा स्वत: कॉलेजला जायला लागली तेव्हा आयुष्यात काहीतरी राहिल्याची वेदना तिला अधिक तीव्रतेने जाणवू लागली.

स्वावलंबनची गरज तिला भासू लागली, तिने आपलं शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. हुशार असल्यानं शिकवण्याचं उत्तम कौशल्य तिच्याकडे होतं आपण चांगले शिक्षक होऊ शकतो यावर तिला विश्वास होता पण शिक्षक होण्यासाठी आवश्यक ती पदवी मात्र तिच्याकडे नव्हती. तेव्हा शिक्षण घेऊन तिने पदवी संपादन केली. बारावीही पूर्ण न केल्यानं तिला अनेक अडचणी येत होत्या पण तिने शेवटपर्यंत हार मानली नाही. आज ती शिक्षिका आहे आणि विषेश म्हणजे स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी आहे.

Story img Loader