‘व्हॅलेंटाईन डे’ आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला. कित्येक प्रेमवीरांची प्रकरणं जुळली, काही विस्कटली. अनेकांच्या आयुष्यात मोरपंखी दिवस सुरू झाले तर अनेकांनी धडपडत का होईना पण आपल्या ‘दिला’ला दवापाणी करत आयुष्याची वाट पकडली.
तिच्या आयुष्यातही हा दिवस इतर सर्वांसारखाच सुरू झाला. सकाळी ‘त्या’चा फोन आला. घरात नव्हता तो. खूप खूप दूर होता. पण फोनवरचा त्याचा आवाज नेहमीसारखाच. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्यावर तिच्यासाठी तो आज एक गिफ्ट पाठवणार असल्याचं तो म्हणाला. तिला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान वाटलं.
आणि नंतर लष्कराकडून ‘तो’ गेल्याचा फोन आला!
दुसऱ्या दिवशी त्याने स्वत:च्या हाताने पाठवलेलं ‘व्हॅलेंटाईन डे’ चं गिफ्ट आलं!
नियतीने मेजर सतीश दहियाची पत्नी सुजाताशी क्रूर खेळ केला होता.
१७ फेब्रुवारीलाच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दोघांच्या दोन वर्षांच्या मुलीला मृत्यू म्हणजे काय हे कळण्याआधीच तिला तिच्या बाबाला शेवटचा निरोप द्यावा लागला.
“माझ्या पोरीने देशासाठी तिचा बाबा दिला” दु:खाचे कढ परतवत सुजाताने दिलेली ही प्रतिक्रियाच ही संपूर्ण कहाणी सांगून जाते.
२००९ साली लष्करात भर्ती झालेल मेजर दहियांना त्यांच्या शौर्यासाठी याआधी पुरस्कारही मिळाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये हांदवाडामध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांचं पार्थिव मध्य प्रदेशमध्ये महेंद्रगढ जिल्ह्यात बनिहारी गावात हेलिकाॅफ्टरने आणलं गेलं. संपूर्ण सरकारी इतमामात मेजर दहियांवर अंत्यसंस्कार झाले.
या वर्षाच्या शेवटीच २० दिवसांच्या सुट्टीवर मेजर दहिया घरी आले होते. आपल्या कुटुंबीयांसोबत आपली पत्नी सुजाता, मुलगी प्रिया या सगळ्यांची भेट घेऊन ६ जानेवारीला पुन्हा कामावर रूजू झाले होते.
पण नियतीच्या मनातल्या क्रूर खेळात या सगळ्यांचंच जग उलटपालटं झालं.