मिंत्रा या ऑनलाईन शॉपिंग कंपनीला शुक्रवारी सकाळी जबरदस्त धक्का बसला. कारण या कंपनीला जवळपास बहिष्कृत करण्याचा चंगच नेटीझन्सने बांधला होता. अचानक नेटीझन्सना काय झाले हे कळायला कंपनीला मार्गच नव्हता. तोपर्यंत हजारोंनी #BoycottMyntra हा हॅशटॅग वापरून या कंपनी विरोधात निषेध नोंदवला होता. हा हॅशटॅश दुपारपर्यंत ट्विटरवर ट्रेंडिंगमध्येही होता. या निषेधाचे कारण होते ते या कंपनीची आक्षेपार्ह जाहिरात. महाभारतातील द्रोपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा मिंत्राने जाहिरातीसाठी वापर केला होता आणि हे पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या म्हणूनच सगळ्यांनी #BoycottMyntra हा हॅशटॅग वापरून कंपनीविरोधात आपली नाराजी व्यक्त केली. कौरव द्रोपदीचे वस्त्रहरण करताना लाज राखण्यासाठी द्रोपदी श्रीकृष्णाची प्रार्थना करते आणि कृष्ण तिची लाज राखत तिला वस्त्र पुरवतो या महाभारतातल्या घटनेचा चुकीच्या पद्धतीने जाहिरातीत वापर केला गेला आहे. यात श्रीकृष्ण मोबाईलमध्ये मिंत्राचे अॅप वापरून द्रोपदीला साडी पुरवतो असे दाखवण्यात आले आहे त्यामुळे साहजिक हिंदुधर्मीयांच्या भावना दुखावल्या आणि या गुन्ह्यासाठी मिंत्रावर बहिष्कार टाकण्याचे नेटीझन्सने ठरवले.
दरम्यान ही जाहिरात मिंत्राने बनवलीच नव्हती त्यामुळे आपण असे काहीच केले नसल्याचे मिंत्राच्या अधिकृत अकाउंटवर ट्विट करून सांगण्यात आले आहे. आपल्या नावाचा गैरफायदा घेत कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मिंत्राने म्हटले आहे. आपली परवानगी न घेता स्क्रोल डाऊनने हे लज्जास्पद कृत्य केले आहे आणि याचा कंपनीशी कोणताही संबध नसल्याचे देखील मिंत्राने सांगितले आहे. तसेच प्रतिमा मलिन केल्याबद्दल संबधितांवर कारवाई करण्यात येईल असेही मिंत्राने ट्विट करून स्पष्ट केले आहे. तर स्क्रोल डाऊने ही आक्षेपार्ह जाहिरात केल्याप्रकरणी मिंत्राची आणि सगळ्या लोकांची जाहिर माफी मागितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myntra faces boycott on twitter and theyre not even at fault