प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळ असलेले मिंत्रा डॉट कॉमला सोशल मिडीयावरील नेटिझन्सच्या रागाला सामोरे जावे लागले. #BoycottMyntra असा हॅशटॅग शुक्रवारी दिवसभर ट्विटर ट्रेण्डमध्ये होता. फ्लिपकार्टचे मालकी हक्क असलेल्या या ई-कॉमर्स कंपनीला सोशल मिडीयावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले. यूजर्सनी एका वादग्रस्त जाहिरातीवर मिंत्राचा लोगो पाहिला आणि त्यानंतर सोशल मिडीयावर राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. या जाहिरातीत महाभारतातील एक दृश्य अॅनिमेटेड स्वरुपात दाखविण्यात आलेले आहे. द्युतात पांडवांचा पराभव झाल्यानंतर कौरवांनी द्रौपदीचे भर सभेत वस्त्रहरण केले होते. हेच दृश्य या जाहिरातीत दाखविण्यात आलेय. द्रौपदीच्या मदतीला आलेले भगवान कृष्ण  हे मिंत्रावरून एक लांबलचक साडी विकत घेत असल्याचे जाहिरातीत दाखविण्यात आले. ही जाहिरात पाहताच एका युजरने मिंत्राकडून याविषयी स्पष्टीकरण मागितले होते. सदर युजरचे ट्विट काही वेळातच इतके व्हायरल झाले की लोकांनी मिंत्रावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.
या संपूर्ण प्रकरणामागे काही वेगळेच सत्य होते. खरंतर, हे ग्राफिक (जाहिरात नाही) स्‍क्रॉलड्रॉल नावाच्या एका संकेतस्थळाने तयार केले होते. यामध्ये मिंत्राचा कुठेही हात नव्हता. या ग्राफिकवर वाद उद्भवल्यानंतर स्वतः स्‍क्रॉलड्रॉलने यासंबंधी माहिती दिली. या संकेतस्थळाने ट्विरद्वारे सदर ग्राफिक फेब्रुवारीत तयार केल्याचे सांगितले. पण त्यावेळी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे लक्षात येताच त्याचक्षणी आम्ही ते ग्राफिक हटवले होते. स्क्रॉलड्रॉलने माफी मागितल्यानंतर आपल्या या ग्राफिकशी काहीच संबंध नसल्याचे मिंत्राने सांगितले. तसेच ब्रॅण्डचा वापर केल्याप्रकरणी आपण स्क्रॉलड्रॉलवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही मिंत्राने म्हटले आहे.

Story img Loader